वाशिम शहरातील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालया बाहेरील परिसर झालाय डम्पिंग ग्राऊंड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वाशीम, दि. ०२ जानेवारी: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील संपूर्ण शाळा – कॉलेज सह वाशिम येथील पॉलिटेक्निक कॉलेज ही बंद आहे. याचाच फायदा घेत वाशिम शहरातील काही फार्मासिस्ट आपल्या मेडिकल स्टोअर मधील कालबाह्य झालेल्या बीपी, शुगर, हृदय या रोगांसाठी आवश्यक असलेल्या हजारो रुपये किंमतीच्या गोळ्या आणि औषधी पॉलिटेक्निक कॉलेज परिसराच्या बाहेरील रस्त्याच्या कडेला फेकून देत आहेत. ह्या उपयोगात न येणाऱ्या औषधीच्या कचऱ्या मध्ये भटकी कुत्री, गाई-गुर ही तोंड घालत आहेत. ज्यातून एखाद्या मुक्या प्राण्यांचा जीव ही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

औषधी विभागाकडून प्रत्येक औषधी केंद्र (फार्मासिस्ट सेंटर) यांना कालबाह्य झालेल्या औषधीचे विल्हेवाट लावण्यासाठी खड्डा करून त्यात जाळून नष्ट करण्याचे सूचना असतांनाही याकडे औषधी विक्रेता डोळेझाक करीत आहेत आणि त्या ठिकाणी मुके जनावरे औषधी खाल्ल्यामुळे जीव जाण्याची शक्यता अधिक असल्याने वेळीच आरोग्य प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.