फायरलाइनच्या कामावरील महिला मजूर वाघाच्या हल्ल्यात ठार

ताडोबाच्या कोलारा कोअर क्षेत्रातील घटना

चंद्रपूर, १८ डिसेंबर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या कोलारा उपक्षेत्रातील चिखलवाही नियतक्षेत्रात रोजंदारी मजुरांकडून जंगलात फायरलाईनचे (जाड रेषा) काम करीत असतांंना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक जोरदार हल्ला करून काही अंतरापर्यंत ओढत नेल्याने त्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृतक महिलेचे नाव विद्या वाघाडे असे आहे. सध्या कोरोनामुळे रोजगार उपलब्ध नसल्याने मिळेल त्या मजुरीसाठी मजूर जात असतात. सध्या वनविभागाचे विविध काम जंगलामध्ये चालू आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प घनदाट वनांनी व्यापला आहे. त्यामुळे दरवर्षी फायरलाईनचे काम माजुरामार्फत केले जाते. त्यासाठी मजुरांची गरज असते.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांत विविध वन्यप्राणी आहेत. कर्मचारी मजूरवर्गासह याठिकाणी पर्यटन स्थळ असल्याने जगभरातील पशुप्रेमी आवर्जून भेट देत असतात. मात्र आता पशुप्रेमिंना सतर्क राहण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी सदोदित आवाहन करीत आहेत. सध्या याच वर्षात वाघाच्या हल्ल्यात सहा बळी गेल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.