लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. १० एप्रिल: अमरावती मार्गावरील वाडी नजीकच्या वेल ट्रीट हॉस्पीटलमध्ये शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास आग लागली. यात तिघांचा गुदमरुन मृत्यु झाला. यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. हॉस्पीटल मधील एसीमध्ये शॉर्ट सर्कीट झाल्याने आग लागल्याची माहिती आहे.
आग लागल्यामुळे एकच खळबळ उडालेली होती. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवान आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या मदतीने रुग्णांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आले. आग लागली तेव्हा ३१ रूग्ण रुग्णालयात होते.
घटनेची माहिती मिळताच मंत्री सुनील केदार, नागपुर जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि माहिती घेतली. घटनेची चौकशी संबधित विभागा कडून करण्यात येईल असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.