लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्याचबरोबर समृद्ध आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत “गडचिरोली महोत्सव” भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवानंतर दि. २८ डिसेंबर रोजी ‘महामॅरेथॉन २०२५ (सीझन-३)’ चे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे आदिवासी समूह नृत्य स्पर्धा, वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा व बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा. जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातून आलेले संघ या स्पर्धांमध्ये सहभाग घेणार असून, त्यामुळे खेळाडूंना आपली गुणवत्ता सादर करण्याची संधी मिळणार आहे.
महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था व उद्योजक आपली उत्पादने व वस्तूंचे स्टॉल लावणार आहेत. तसेच हस्तकलेच्या आकर्षक वस्तूंचे स्टॉलही नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहेत. दि. २६ व २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांची संगीत मैफल, तसेच हास्यकलावंत भारत गणेशपूरे व कुशल बद्रिके, अभिनेत्री हेमांगी कवी व माधुरी पवार, गोंडी गीत ‘ओ सांगो’मुळे लोकप्रिय ठरलेल्या ममता उईके व अर्जुन धोपटे, ‘सारेगमप’ विजेते निरंजन बोबडे, तसेच गायक पद्मनाभन गायकवाड यांचा समावेश आहे. यासोबतच जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांनाही आपली कला सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, दि. २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील १४ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे. या स्पर्धेत विविध वयोगटांसाठी २१ किमी, १० किमी, ५ किमी व ३ किमी अशा अंतराच्या शर्यती घेण्यात येणार आहेत.
सर्व सहभागी धावपटूंना टी-शर्ट, मेडल, हुडी बॅग, प्रमाणपत्र, झुंबा सेशन व अल्पोपहार देण्यात येणार असून, विजेत्यांना पुरुष व महिला गटात ५१ हजार रुपयांपासून ३ हजार रुपयांपर्यंत, एकूण ४ लाख १४ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या महोत्सवामुळे खेळाडू, कलाकार व आदिवासी युवकांचा उत्साह द्विगुणीत होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.