नागपंचमी उत्सवानिमित्त नागदेवता मंदिरात भव्य जत्रेचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, २५ जुलै २०२५ : अहेरी तालुक्यातील आलापल्लीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर सिरोंचा महामार्गालगत वसलेले नागदेवता मंदिर हे हजारो भक्तांचे श्रद्धास्थान मानले जाते. नवसाला पावणारा देवस्थान म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर २९जुलै रोजी नागपंचमीच्या दिवशी भाविकांनी फुलून जानार आहे. यंदाही नागपंचमीच्या निमित्ताने मंदिर परिसरात भव्य जत्रेचे आयोजन करण्यात आले असून, गडचिरोलीसह आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमधून हजारो भाविक भक्त येथे दर्शनासाठी येत आहेत.

यंदाच्या जत्रेतील महाआरतीचा मान अहेरी येथील केंद्रप्रमुख महेशजी मुक्कावार व त्यांच्या पत्नी शिक्षिका सौ. शालिनीताई मुक्कावार यांना देण्यात आला. यानिमित्त मंदिर परिसरात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबवले जात आहेत. विविध भक्तगणांकडून महाप्रसाद, दूध, केळी, हलवा आदींचे वाटप केले जात आहे. तसेच जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज भक्तसेवा मंडळाच्या वतीने शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

जत्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या मोठ्या संख्येची अपेक्षा असल्याने पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिर समितीकडून दर्शनासाठी स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले असून, भाविकांची रांग शिस्तीत ठेवण्यास मदत केली जात आहे. सकाळपासून सुरू झालेली पूजा, भजन आणि कलाप्रसादाच्या कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. सायंकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर जत्रेची सांगता होणार आहे.

या पावन उत्सवात अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नागदेवता मंदिर समितीचे अध्यक्ष वासुदेव पेद्दीवार, विश्वस्त प्रा. पद्मनाभ तुंडुलवार, भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, सेवानिवृत्त वनपरीक्षेत्र अधिकारी चंद्रशेखर तोंबारलावार, व्यंकटेश मदेर्लावार, सागर बिटीवार व समितीच्या इतर सदस्यांनी केले आहे.

Allapali nag MandirNag Panchamiआलापल्ली यांचा सेवभाव..नाग मंदिर अहेरीभक्तगणसामाजिक संघटना