आंतरराज्यीय गांजा तस्करीचा मोठा पर्दाफाश उघड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिरोंचा : महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील पातागुडम येथे पोलिसांनी सोमवारी रात्री धाडसी कारवाई करत आंतरराज्यीय गांजा तस्करीचा मोठा पर्दाफाश केला. ट्रॅव्हल्स बसमधून दोन चालक व एका प्रवाशाला अटक करण्यात आली असून, सुमारे ४ ते ५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

जगदलपूर–हैदराबाद मार्गावरील (क्र. सीजी.१६ सीएस.९०९९) या ट्रॅव्हल्सची पातागुडम वन तपासणी नाक्यावर झडती घेण्यात आली. यावेळी एका प्रवाशाकडे गांजा सापडला. त्यानंतर बससह मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला.

ही कारवाई उपनिरीक्षक मंगेश कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अटक करण्यात आलेल्यांत चालक रवी विश्वकर्मा (रा. बिजापूर, छत्तीसगड), वरुण सोडी (रा. मद्देड, छत्तीसगड) आणि प्रवासी पिशू पुनेम (रा. राणीबोदली, छत्तीसगड) यांचा समावेश आहे. तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपास सुरू आहे.

सीमावर्ती भाग संवेदनशील

पातागुडम परिसरातून अशा प्रकारची तस्करी वारंवार उघड होत असल्याने हा भाग पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. इंद्रावती नदीवरील तीन पुलांमुळे महाराष्ट्र–छत्तीसगड दरम्यानची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. त्याचाच फायदा घेऊन तस्करीचं रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.”

Sironcha durg
Comments (0)
Add Comment