लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोलीत आज माओवादी चळवळीवर मोठा धक्का बसला आहे . दोन डिव्हिजनल कमिटी सदस्यांसह अकरा वरिष्ठ माओवादी सदस्यांनी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे. त्यांच्या ताब्यातील चार बंदुका त्यांनी अधिकृतपणे पोलिसांकडे जमा केल्या आहेत. ८२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्या या माओवादी सदस्यांच्या आत्मसमर्पणामुळे संपूर्ण दंडकारण्यात माओवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. गडचिरोली पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त प्रयत्नांचं हे मोठं यश मानलं जात आहे.
गडचिरोली पोलिस मुख्यालयात पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत आयोजित विशेष समारंभाला सकाळपासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात दीर्घकाळ नक्षल चळवळीत कार्यरत असलेल्या ११ वरिष्ठ माओवादी सदस्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करली.यामध्ये दोन डिव्हीसीएम दर्जाचे, तीन पीपीसीएम, दोन एसीएम आणि चार सदस्य पदावरील माओवादी सदस्यांचा समावेश आहे.
त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकत्रित ८२ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते.चार जणांनी माओवादी गणवेशात आणि स्वतःकडील AK रायफल आणि इतर शस्त्रांसह आत्मसमर्पण करत उपस्थितांना थरारून टाकलं. गडचिरोली पोलिस व सीआरपीएफच्या धडाकेबाज ऑपरेशन्समुळे २०२५ सालातच आतापर्यंत ११२ माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. २००५ पासूनच्या आत्मसमर्पण धोरणामुळे गडचिरोलीत आजवर ७८३ माओवादी सदस्य शस्त्रसामग्री खाली ठेवून शांततेचा मार्ग स्वीकारत आहेत. याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात पोलित ब्युरो सदस्य आणि केंद्रीय समिती सदस्य भूपती यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केल्याने माओवादी संघटनेला ऐतिहासिक धक्का बसला होता. आजचे आत्मसमर्पण त्या मालिकेतील आणखी एक निर्णायक अध्याय ठरलं आहे.
कार्यक्रमादरम्यान सी-६० कमांडो आणि विशेष अभियान पथकातील अधिकारी व जवानांचा पोलिस महासंचालकांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या दलाने अतिदुर्गम लाहेरी जंगल परिसरात जाऊन ६१ माओवादी सदस्यांना ५४ अग्निशस्त्रांसह आत्मसमर्पण करायला भाग पाडण्याचं उल्लेखनीय काम केलं होतं.दुर्गम भागात शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट उडान – वेध विकासाचा’ या शासकीय योजना मार्गदर्शिकेचं अनावरणही यावेळी करण्यात आलं.आत्मसमर्पण करणाऱ्या सर्व ११ जणांना शासनाच्या पुनर्वसन योजनेनुसार २ लाखांपासून ८.५ लाखांपर्यंत आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. पती-पत्नी एकत्र आत्मसमर्पण करणाऱ्या तिघा जोडप्यांना अतिरिक्त १.५ लाखांची मदत तर एकत्रित गटाने शरणागती पत्करल्याने १० लाख रुपयांची विशेष मदतही देण्यात येणार आहे. दंडकारण्यातील माओवादी चळवळ आता शेवटच्या टप्प्यात पोहोचत असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे स्पष्ट निरीक्षण आहे. गडचिरोलीच्या जनजीवनात शांतता परतण्याची चिन्हे अधिक दृढ झाली आहेत.