गडचिरोलीत तांत्रिक शिक्षणाची नवी दिशा; CIIIT केंद्रास मुख्य सचिवांची भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी नुकतीच गोंडवाना विद्यापीठ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड ट्रेनिंग’ (CIIIT), गडचिरोली या अत्याधुनिक कौशल्यविकास केंद्रास भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संस्थेतील विद्यार्थी व प्राध्यापकांशी सखोल संवाद साधत तांत्रिक शिक्षण, नवकल्पना व उद्योगाभिमुख प्रशिक्षण उपक्रमांचा आढावा घेतला.

मुख्य सचिव अग्रवाल यांनी CIIIT मधील विविध प्रयोगशाळा, प्रशिक्षण विभाग व प्रकल्प सादरीकरण कक्षांना भेट देत विद्यार्थ्यांनी विकसित केलेले प्रत्यक्ष कार्यरत मॉडेल्स पाहिले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रॉडक्ट डिझाइन अँड डेव्हलपमेंट, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), इंडस्ट्रियल ऑटोमेशन आदी क्षेत्रांतील प्रकल्प सादर करत त्यांच्या औद्योगिक उपयोगांबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांची संकल्पनात्मक स्पष्टता, तांत्रिक अंमलबजावणी व व्यावहारिक दृष्टिकोन पाहून मुख्य सचिवांनी समाधान व्यक्त केले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अग्रवाल यांनी त्यांच्या नवोन्मेषी दृष्टिकोनाचे, तांत्रिक कौशल्यांचे आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाचे विशेष कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून केवळ नोकरी शोधण्याऐवजी उद्योजकता, स्टार्टअप्स व रोजगारनिर्मितीकडे युवकांनी वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. राज्याच्या विकासात युवकांची भूमिका निर्णायक असून, तंत्रज्ञान व नवकल्पनांच्या जोरावर सामाजिक व आर्थिक परिवर्तन शक्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

ग्रामीण व आदिवासी भागातील युवकांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यासाठी CIIITसारख्या संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले. अशा केंद्रांमुळे मागास भागातील युवक मुख्य प्रवाहात येत असून, उद्योगक्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी नागपूर विभागीय आयुक्त विजया विजयालक्ष्मी बिदरी, अविश्यांत पंडा, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, अधिष्ठाता डॉ. श्याम खंडारे, संचालक प्रो. मनीष उत्तरवार, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) योगेंद्र शेंडे, तसेच टाटा टेक्नॉलॉजीजचे वरिष्ठ अधिकारी, CIIIT चंद्रपूर व गडचिरोलीचे अधिकारी, अभियंते व संपूर्ण टीम उपस्थित होती.