लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ज्या भामरागड उपविभागाला एकेकाळी नक्षलवाद्यांचा अभेद्य किल्ला मानले जात होते, त्या दुर्गम जंगलपट्ट्यात आता राज्याचा ठाम हस्तक्षेप स्पष्टपणे दिसू लागला आहे. छत्तीसगड सीमेलगत असलेल्या बिनागुंडा गावात गडचिरोली पोलीस दलाने अवघ्या २४ तासांत सर्व सुविधांनी सुसज्ज असे नवे पोलीस मदत केंद्र उभारून नक्षलवाद्यांच्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरालाच थेट आव्हान दिले आहे.
छत्तीसगड सीमेपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेले बिनागुंडा हे गाव वर्षानुवर्षे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेले होते. पावसाळ्यात गुंडेनूर नाल्याला पूर आला की बिनागुंडासह बंगाडी, कुवाकोडी, फोदेवाडा यांसारखी गावे तब्बल चार महिने संपर्काबाहेर राहत. अशा परिस्थितीत येथे पोलीस मदत केंद्र उभारणे ही केवळ सुरक्षा कारवाई नसून, दुर्गम भागातील विकासाच्या दारावर टाकलेली ठाम पावले आहेत.
या धाडसी मोहिमेसाठी तब्बल १००० हून अधिक सी-६० कमांडो, १८ बीडीडीएस पथके आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. अवघ्या एका दिवसात उभ्या राहिलेल्या या केंद्रात पोर्टा कॅबिन, वायफाय सुविधा, जनरेटर शेड तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ. प्लांट उभारण्यात आला आहे. मोहिमेदरम्यान सुमारे ४० ट्रक साहित्याचा राबता सुरू होता, हे या कारवाईच्या व्यापकतेचे द्योतक आहे.
या केंद्राच्या स्थापनेमुळे केवळ सुरक्षा बळकट होणार नाही, तर रखडलेल्या विकासकामांना गती मिळणार आहे. गुंडेनूर नाल्यावर प्रस्तावित पुलाचे बांधकाम, सात मोबाईल टॉवरची उभारणी, राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करणे आणि दुर्गम भागात एसटी बससेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले सुरक्षा कवच आता उपलब्ध झाले आहे.
पोलीस मदत केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि सीआरपीएफचे कमांडंट शंभू कुमार उपस्थित होते. यावेळी आयोजित जनजागरण मेळाव्यात ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
विशेष म्हणजे, २०२३ पासून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलप्रभावित भागातील सुरक्षा पोकळी कमी करण्याच्या मोहिमेतील हे दहावे पोलीस मदत केंद्र आहे. बिनागुंडातील या केंद्रामुळे महाराष्ट्रातील नक्षलवाद्यांचा अखेरचा सुरक्षित आश्रयस्थानही ढासळल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जंगलाच्या दाट सावलीत उभा राहिलेला हा पोलीस ठाण्याचा नवा दिवा आता केवळ कायदा-सुव्यवस्थेचा नाही, तर विकास, विश्वास आणि भविष्यासाठीचा प्रकाश ठरत आहे.