“शेतीच्या तुकड्याने संपलं नातं – वारसाच्या तलवारीत जन्मदात्याचा मृत्यू”*

दारूच्या नशेत नात्यांची मर्यादा पार – चंद्रपूर शहरात हृदय हेलावणारी घटना...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर, २४ जून २०२५ : “शेतीच्या तुकड्याने पित्याच्या छायेत वाढलेल्या लेकरानेच शेवटी त्याच छायेला रक्ताच्या तलवारीने भेदलं!” – अशी सुन्न करणारी घटना चंद्रपूर शहरातील बिनबा वार्ड परिसरात २३ जून रोजी रात्री घडली. वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून, दारूच्या नशेत मुलानेच जन्मदात्या वडिलांवर धारदार शस्त्राने वार करत जागीच ठार केल्याची ही हृदयद्रावक घटना शहरात खळबळ माजवणारी ठरली आहे.

मृतकाचे नाव ताराचंद ऊर्फ दारासिंग बाबूसिंग बैस (वय ६२) असे असून त्यांची शेती वरोरा तालुक्यातील मोवाडा येथे आहे. सदर जमिनीच्या मालकीहक्कावरून त्यांचा मुलगा मुन्ना ऊर्फ संग्रामसिंग ताराचंद बैस (वय ३०) याच्याशी अनेक दिवसांपासून घरात वाद सुरु होता. पण, २३ जूनच्या रात्री त्याचे रूपच बदलले.

रात्री ९ ते ११ च्या सुमारास दारूच्या नशेत धुंद असलेल्या मुन्नाने पुन्हा एकदा वडिलांशी जमिनीच्या वादावरून वाद घातला. मात्र, यावेळी रागाच्या भरात त्याने घरातील अवजड धारदार शस्त्र उचलले आणि वडिलांच्या डोक्यावर, तोंडावर आणि शरीरावर सपासप वार करत त्यांना जागीच ठार केले. हल्ल्याची तीव्रता इतकी होती की, वडिलांना स्वतःचा जीव वाचवण्याचीही संधी मिळाली नाही.

घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून तो चंद्रपूर येथील शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आरोपी मुन्नाला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा क्र. ४३४/२०२५, भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी मा. अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु व उपविभागीय अधिकारी ना. साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. निशिकांत रामटेके, सपोनि. राजेंद्र सोनवणे आणि चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पथक तपास करत आहे.