लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आलापल्ली, दि. १० जुलै : वीज वितरण केंद्र भामरागड येथे कार्यरत असलेले वरीष्ठ तंत्रज्ञ हे पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना काल सायंकाळी ५.०० ते ६.०० च्या सुमारास घडली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
जितेंद्र शामराव दोडके (३५) असे मृत्यु झालेल्याचे नाव आहे. मृतक म.रा.वि.वि.कं.मर्या. आलापल्ली विभागात येत असलेल्या वीज वितरण केंद्र भामरागड येथे वरिष्ठ तंत्रज्ञ (लाईनमन) या पदावर कार्यरत होते. मृतक हे चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील मुरपार गावचे मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे.
अहेरी तालुक्यात दोन तीन दिवसापासून सततधार पाऊस होत असल्याने पुर पाहण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह पेरमिली नजीकच्या नाल्यावर गेले असता पाण्यात उतरून पाणी पाहता पाण्याचा अंदाज लक्षात न आल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी शोधमोहीम राबविली असता त्यांच्या हाती मृतदेहच आढळून आला.
सदर घटनेची नोंद करून शवच्छेदानासाठी आज उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे पाठविण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मृतक जितेंद्र शामराव दोडके यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहे.पुरात वाहून मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटुंबात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.