लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली १९ मे : जिल्ह्यातील दुर्गम भागांतील आदिवासी मुलांच्या आयुष्यात उमेद आणि आत्मभान फुंकणारा एक अनोखा प्रयत्न नुकताच हेडरी येथे साकार झाला. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन (LIF) च्या पुढाकाराने ८ ते १८ मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसांच्या उन्हाळी शिबिराने केवळ ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मनामनांत नव्या शक्यतांची बीजे रोवली नाहीत, तर एक सशक्त सामाजिक हस्तक्षेप म्हणूनही आपली छाप सोडली.
दररोज ५०० हून अधिक मुलांचा उत्स्फूर्त सहभाग, एटापल्ली व भामरागड सारख्या नक्षलग्रस्त भागांतून दाखल झालेली ९० मुले, आणि त्यांच्यासाठी खास प्रवास, निवास व पौष्टिक आहाराची व्यवस्था – या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे केवळ खेळ किंवा कला नव्हे, तर जीवनदृष्टीच बदलवणारा अनुभव.
शिबिरात ६ ते १६ वयोगटातील मुलांना कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, धनुर्विद्या, नृत्य, चित्रकला, हस्तकला यांसारख्या उपक्रमांतून व्यक्त होण्याची संधी मिळाली. टीम स्पिरिट, नेतृत्वगुण, आणि आत्मविश्वास यांचा प्रत्यय देणाऱ्या या कृतीशिक्षणातून मुलांचे व्यक्तिमत्व आकाराला येताना दिसले. प्रत्येक सहभागीला सन्मानाने क्रीडा पोशाख प्रदान करण्यात आला, ज्यामुळे ‘मीही कुणीतरी आहे’ ही भावना रुजली.
उपक्रमाच्या सामाजिक परिमाणाला व्यापकता देणाऱ्या सत्रांमध्ये पर्यावरण संवर्धन, व्यक्तिमत्व विकास, सुरक्षाविषयक प्रशिक्षण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे करिअर मार्गदर्शन यांचा समावेश होता. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांशी थेट संवाद हे या शिबिराचे खास आकर्षण ठरले. पोलिस सेवांमधील संधी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, आणि कायदा व्यवस्थेची कामकाजपद्धती याविषयी विद्यार्थ्यांना समजून सांगितले गेले.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड व लॉयड्स इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून उद्योग-व्यवसायातील विविध संधींचे दर्शन विद्यार्थ्यांना घडवत होते. आदिवासी भागांतील मुलांच्या दृष्टिकोनात केवळ बाह्य नव्हे, तर अंतर्गत परिवर्तनही घडताना जाणवले.
समारोप सोहळा केवळ उत्सवी नव्हता, तो गावगावांतील आशेचा सोहळा ठरला. पुरसलगोंदी, नागूलवाडी, बुर्गी, मोहोरली, तोडसा, उडेरा, कुदरी आणि एकरा खुर्द या भागांतील सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सभागृह भारावून गेले, आणि त्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाने पालकांच्या डोळ्यांत अभिमान साठला.
या वेळी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन म्हणाले, “हे शिबिर केवळ आनंदाचा प्रसंग नव्हता, तर स्वप्नांची पेरणी करणारा प्रयत्न होता. आम्हाला या मुलांमध्ये भविष्य घडवण्याची प्रचंड ताकद दिसते.”
शिबिरात ४७२ हून अधिक मुलांना २.३५ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची पारितोषिके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या सन्मानाने केवळ मुलांचे मनोबल वाढवले नाही, तर त्यांच्या पालकांनाही नव्या आशा दिल्या.
ग्रामीण भागातील मुलांमध्ये आत्मभान, अभिरुची आणि आकांक्षा जागृत करणारा हा प्रयोग केवळ उपक्रम न राहता एक चळवळ ठरण्याची क्षमता बाळगतो. या शिबिरातून निर्माण झालेली चैतन्याची लहर भविष्यात अनेक घरांतील दिवे उजळवणारी ठरेल, यात शंका नाही.