लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिरोंचा प्रतिनिधी – धर्मराजू वडलाकोंडा
सिरोंचा (गडचिरोली) : रक्षाबंधनाच्या दिवशीच आनंदाचा क्षण एका कुटुंबासाठी शोकांतिका ठरला. अंकिसा गावात घडलेल्या या हृदयद्रावक अपघातात आठ वर्षीय शौर्य कोकूचा जागीच मृत्यू झाला, तर वडील संतोष रामलू कोकू (वय ४३) यांचा डावा हात आणि पाय मोडून ते गंभीर जखमी झाले. आई सौंदर्या कोकू किरकोळ जखमी असून तिच्यावरही उपचार सुरू आहेत.
असरली येथील कोकू कुटुंब भावाला राखी बांधण्यासाठी दुचाकीने सिरोंचा दिशेने जात असताना, अंकिसा गावात रामकृष्ण चिरला यांच्या मालकीची ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्याच्या कडेला उभी होती. अरुंद मार्ग आणि निष्काळजीपणे उभ्या केलेल्या ट्रॉलीमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटताच ती थेट ट्रॉलीला धडकली. अपघात इतका भीषण होता की शौर्यचा जागीच मृत्यू झाला. संतोष कोकू यांना प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र, सिरोंचा येथे नेण्यात आले, मात्र गंभीर अवस्थेमुळे त्यांना पुढे तेलंगणातील वारंगल येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेनंतर गावकऱ्यांच्या भावना उफाळून आल्या. ग्रामस्थांचा आरोप आहे की, रस्त्यावर अतिक्रमण करून निष्काळजीपणे वाहनं उभी केल्यामुळेच अशा दुर्घटना घडत आहेत. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सामान्य नागरिकांनीही अशा ठिकाणी वाहनं उभी न करण्याची खबरदारी घ्यावी, जेणेकरून भविष्यात अशा शोकांतिका टाळता येतील, असे नागरिकांकडून जोरदार आवाहन करण्यात आले.
सिरोंचा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. रक्षाबंधनासारख्या सणाच्या दिवशी एका निरागस जीवाचा घेतलेला बळी आणि कुटुंबावर आलेले दु:ख संपूर्ण तालुक्याला हळहळून टाकणारे ठरले आहे.