मुंबईचे सुप्रसिद्ध सर्जन करणार ‘सर्च’ रुग्णालयात दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया:

भव्य मोफत सर्जरी कॅम्पचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली :– धानोरा तालुक्यातील सर्च शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात  दिनांक- १५ ते १७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येत आहे. अपेंडिक्स, हर्निया, गर्भाशयातील अंडाशयाच्या गाठी व पित्ताशयातील खडे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात येईल.
सदर ऑपरेशन शिबिरासाठी स्पेशलिस्ट सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प घेण्यात येणार असून मुफ्फझल लकडावाला हे भारतातील प्रसिद्ध लॅप्रोस्कोपीक सर्जन आहेत. त्यांनी  भारतात आणि परदेशात अनेक शस्त्रक्रिया केल्या असून ते डायजेस्टिव्ह हेल्थ इन्स्टिट्यूटचे संस्थापक असून बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेच्या क्षेत्रातील त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जातात. दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेची सुविधा ग्रामीण भागातील रुग्णांना मिळावी यासाठी चातगाव येथील सर्च रुग्णालयाने सर्जरी  कॅम्पचे आयोजन केले आहे.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी गरजू  रुग्णांना शस्त्रक्रियेची सुविधा मिळावी यासाठी भव्य मोफत  सर्जरी कॅम्पचे आयोजन केले आहे. ऑपरेशन संबंधित प्रयोगशाळा तपासणी व ऑपरेशन मोफत राहणार आहे, सर्जरीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच ऑपरेशन भरती दरम्यान रुग्ण व एक नातेवाईक यांना मेससुविधा मोफत दिल्या जाईल. तरी सर्जरी कॅम्प करिता रुग्णांनी सर्च रुग्णालयात १० नोव्हेंबर पूर्वी येऊन ऑपरेशन साठी नाव नोंदणी करून घ्यावे. येताना आधारकार्ड व रेशनकार्ड सोबत घेऊन यावे.
Comments (0)
Add Comment