रत्नागिरीतल्या काळबादेवीत आढळला पांढरा कावळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

के. सचिनकुमार       

रत्नागिरी, दि. २७ मे : रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी गावात शेट्येवाडीत पांढरा कावळा आढळला आहे. शेखर शेट्ये यांनी निरीक्षण करुन ही वार्ता फोटोज्, व्हीडीओद्वारे सगळीकडे पाठवली. गेले चार दिवस शेट्ये यांच्या घराजवळ पांढर्‍या कावळ्याची हजेरी चर्चेचा विषय ठरला आहे.

काळबादेवी येथील शेखर शेट्ये यांच्या घराजवळ आढळला पांढरा कावळा

काळबादेवी येथील शेखर शेट्ये यांच्या घराजवळ पक्षी परिसरातील झाडांवर आढळतात. चार दिवसांपूर्वी शेट्ये यांच्या घराच्या बाजूला असलेल्या कोंबड्यांना खाणं घालत असतांना काही कावळे तिथे आले. त्यात एक पांढरा पक्षी दिसला. दाणे टिपणारा तो पक्षी कबुतर असावे असे वाटले. थोडे कुतूहलाने त्यांनी त्याचे निरीक्षण केल्यावर तो कावळाच वाटला.

त्या पांढर्‍या पक्षाची ठेवण, चोच आणि डोळा हा नेहमीच्या कावळ्यासारखाच होता. थोडावेळ थांबून त्यांनी आवाज ऐकला तर तो कावळाच असल्याचे स्पष्ट झाले. शेखर यांनी पांढर्‍या कावळ्याची गोष्ट शेजारच्यांना सांगितली. सर्वच जणं त्याला पहायला आले. काहींनी छायाचित्रे काढून सोशल मीडियावरही शेअर केली. पांढरा कावळा हा दुर्मिळ आहे. त्यामुळे हा कावळा काळबादेवीकरांसाठीच नव्हे तर रत्नागिरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत शेखर शेट्ये म्हणाले की, दुसरा पक्षी आला की कावळे त्याला बोचून काढतात; मात्र पांढर्‍या रंगाचा पक्षी इतर कावळ्यांच्या जोडीने खाद्य खाण्यासाठी घराच्या जवळ निर्धास्त येत आहे. त्यामुळे तो त्यांच्यातलाच असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तो कावळा ल्युकेस्टिक – पक्षीतज्ञ

दरम्यान कावळ्याचा पांढरा रंग हा नैसर्गिक आहे. काळबादेवी येथील तो कावळा ल्युकेस्टिक आहे असल्याचं पक्षी तज्ञ प्रतिक मोरे यांनी सांगितलं. काळा रंग येण्यासाठी शरीरात मेलिनीनचे द्रव्य आवश्यक असते. ते कमी असल्यामुळे कावळ्याला पांढरा रंग येतो. काळबादेवीत आढळलेला तो कावळा ल्युकेस्टिक आहे. एका अर्थाने हा पांढरा कावळा नाही तर त्याच्यातील अनुवंशिकतेमुळे तो पांढरा राहिला असावा असं मोरे यांनी म्हटलं आहे.

हे देखील वाचा :

कोरोनाच्या संकटकाळात बुद्धांची करुणा आमच्यासोबत – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

 

animallead storywhite crow