लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) कार्यकर्त्यांनी गडचिरोली येथे विद्यापीठावर मोर्चा काढला. “विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चालढकल करते, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता नाही,” असा आरोप करत अभाविपने तीव्र रोष व्यक्त केला.
मोर्चादरम्यान अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी शैक्षणिक प्रवेशाची अंतिम तारीख १५ ऑगस्ट निश्चित करून त्यावर आधारित विद्यापीठाचे शैक्षणिक कॅलेंडर तातडीने तयार करावे, अशी प्रमुख मागणी केली. प्रवेश प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ती अधिक पारदर्शक व सुलभ करावी, प्रवेशासंबंधी सर्व माहिती विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवावी, तसेच अनेक वर्षांपासून थांबलेल्या विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका तत्काळ घेण्यात याव्यात, या मागण्याही करण्यात आल्या.
याशिवाय, विविध अभ्यासक्रमांच्या शुल्कावरील शासन नियमांचे उल्लंघन होत असून, विद्यापीठ प्रशासनाने त्याची अंमलबजावणी टाळल्याचा आरोपही अभाविपने केला. यानंतर अभाविप प्रतिनिधींनी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
या मोर्चात विदर्भ प्रांत मंत्री पायल किन्नाके, चंद्रपूर जिल्हा संघटनमंत्री सुजान चौधरी, गडचिरोली जिल्हा संयोजक विकास बोदलकर, चंद्रपूर जिल्हा संयोजक भूषण डफ, ब्रम्हपुरी जिल्हा संयोजक राजकुमार गेडाम, गडचिरोली नगर मंत्री संकेत म्हस्के आणि कल्याणी मानगुळदे यांच्यासह असंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते.
गोंडवाना विद्यापीठ स्थापनेपासूनच विविध वादांमुळे चर्चेत राहिले आहे. पदभरतीतील अपारदर्शकता, साहित्य खरेदीतील अनियमितता, पदवीदान सोहळ्यांतील खर्चप्रश्न अशा अनेक प्रकरणांनंतर आता पीएच.डी.च्या मौखिक परीक्षा नियमबाह्य पद्धतीने घेण्यात आल्याचा आरोप काही सिनेट सदस्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठाच्या अनेक प्राधिकरणांवर शिक्षण मंचचे वर्चस्व असून, अशा पार्श्वभूमीवर अभाविपच्या मोर्चाला वेगळे राजकीय व शैक्षणिक महत्त्व प्राप्त झाले आहे.