मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला संचित रजा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:  

नागपूर, दि. २६ नोव्हेंबर: नागपूर विभागाच्या उपमहानिरीक्षकाचा (कारागृह) आदेश रद्द ठरवून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १९९६ मध्ये मुंबई बॉम्बस्फोटामधील आरोपीस संचित रजा मंजूर केली आहे.
 मोहम्मद याकुब नगुल मुंबई १९९६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी आढळून आला असून शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याने तातडीची संचित रजा मिळण्यासाठी नागपूर विभागाच्या उपमहानिरीक्षकांकडे (कारागृह) अर्ज सादर केला होता. संचित रजेसाठी दोन लाख रुपये अनामत रक्कम जमा करावी लागेल, असे आरोपीला सांगण्यात आले. या आदेशाला आरोपीने अ‍ॅड. मीर नगमान अली यांच्यामार्फत नागपूर खंडपीठात आव्हान दिले. न्यायमूर्तीद्वय आर.के. देशपांडे व ए.जी. घारोटे यांच्या खंडपीठात या याचिकेवर सुनावणी झाली. यापूर्वी आरोपीला पाच हजार रुपयाच्या जामीनावर संचित रजा मिळाली आहे. रजा संपताच तो परतही आला आहे. असे असताना दोन लाख रुपये भरण्यास सांगणे हे अन्यायकारक आहे. तो एवढी रक्कम अनामत म्हणून जमा करू शकत नाही. त्यामुळे हा आदेश अन्यायकारक असल्याकडे बचाव पक्षाच्या वकिलांनी खंडपीठाचे लक्ष वेधले. दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर खंडपीठाने उपमानिरीक्षकांनी (कारागृह) काढलेला आदेश रद्द ठरवला व आरोपीला संचित रजा मंजूर केली. 

Nagpur High Court