नवेगाव येथे ८ अवैध दारुविक्रेत्यांविरुद्ध कारवाई; १.८४ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली २६ जुलै : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मौजा नवेगाव (ता. धानोरा) येथे अवैध दारू विक्री व साठवणूक करणाऱ्या ८ जणांविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत एकूण १.८४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गडचिरोली पोलिस ठाणे आणि कारवाफा पोलिस मदत केंद्राच्या संयुक्त पथकांनी २५ जुलै रोजी विशेष मोहिमेतून केली.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. गुप्त माहितीच्या आधारे, नवेगाव येथे अवैध दारू विक्री सुरू असल्याचे समजल्यावर, कारवाफा पोलिसांनी पायी पोहचत गावात छापा टाकला. यावेळी देशी-विदेशी दारूचा ९९,४०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला, तर गावठी दारू व हातभट्टीसाठी वापरले जाणारे साहित्य नष्ट करण्यात आले. त्याची एकूण अंदाजित किंमत ८५,००० रुपये इतकी आहे.

कारवाईदरम्यान खालील ८ आरोपींविरुद्ध कलम ६५ (इ), ६५ (फ), महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:

१. प्रभुदास शिशू गावडे (४०)

२. पंचफुला सुरेश नरोटे (४२)

३. मनिषा केशव तुमरेटी (५०)

४. निलीमा वसंत तुमरेटी (३५)

५. दिलीप शिशू गावडे (३२)

६. अशोक तुळशीराम पदा (४७)

७. जैराम बुधाजी गावडे (५८)

८. परशुराम पांडुरंग तुमरेटी (४४)

(सर्व रा. नवेगाव, ता. धानोरा, जि. गडचिरोली)

सदर मोहिमेचा पुढील तपास गडचिरोली पोलिस ठाण्याकडून सुरू असून, जिल्ह्यातील अवैध मद्यव्यवसायाचा समूळ बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न अधिक तीव्र करण्यात आले आहेत.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली (प्रशासन) गोकुलराज जी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कारवाफा जगदीश पांडे व गडचिरोलीचे सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत पोनि. विनोद चव्हाण, पोउपनि. मारबोनवार, पोहवा संजय पोल्लेलवार, प्रेमकुमार भगत, गुलाब कामतकर (पो. ठा. गडचिरोली) व पोउपनि. संतोष कदम, म.पोउपनि. सुनिता शिंदे (पो.म.के. कारवाफा) आणि इतर अंमलदार सहभागी होते.

Dhanora daru japtiनवेगाव अवैध दारू