वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बीड, दि. १ मे: बीडमध्ये बोगस एचआरसीटी स्कोअर देणारे रॅकेट सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना एचआरसीटी काढल्यानंतर किती संसर्ग झाला आहे, हे लक्षात येते मात्र बोगस स्कोर वाढून देऊन रुग्णांची लूट करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
हा सर्व प्रकार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी समोर आणला असून याविषयीची तक्रार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, ‘डोंगरे नामक महिला या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यांचा जिल्हा रुग्णालयात एचआरसीटी स्कोअर तपासला असता ३ स्कोअर दिला होता. त्यांचा शहरातील शिवाजीराव हार्टकेअर सेन्टरमध्ये एक्सरे काढला असता नॉर्मल आला. पुन्हा त्याच शहरातील unique advance सिटी सेंटरमध्ये एचआरसीटी स्कोअर तपासणी केली असता १० स्कोअर दिला. हा सर्व प्रकार केवळ १ ते २ तासात झाला आहे.
दरम्यान, अशा स्वरूपाचे बोगस एचआरसीटी स्कोअर देणारे रॅकेट बीडमध्ये असण्याची शक्यता असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक शोषण सुरू आहे. यामुळे ज्यांनी बोगस आणि चुकीचे रिपोर्ट दिले आहेत. त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एचआरसीटी सेंटर फोडू, असा सज्जड इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी दिला आहे.