गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श पदवी महाविद्यालयाची जिल्हा युवा महोत्सवात झळाळती कामगिरी

समूह लोकनृत्य आणि समूह लोकगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक; विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५-२६ नुकताच उत्साहात पार पडला. या महोत्सवात गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श पदवी महाविद्यालय, गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेची, सर्जनशीलतेची आणि सांघिक समन्वयाची अप्रतिम झलक सादर करत समूह लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच समूह लोकगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे आदर्श महाविद्यालयाची विजयी चमू आता विभागीय स्तरावरील स्पर्धांसाठी पात्र ठरली असून, पुढील टप्प्यात अधिकाधिक यश मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शाम खंडाळे, विभाग प्रमुख प्रा. पंकज राऊत, डॉ. प्रीती भांडेकर आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अंतबोध बोरकर यांनी विजयी चमूचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

प्राचार्य डॉ. खंडाळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाचा अभिमान उंचावला असून, हे यश पुढील स्पर्धांसाठी प्रेरणादायी ठरेल. कला आणि शिक्षण यांचा संगम घडवून विद्यार्थ्यांनी खरी प्रगती साधली आहे.

या यशामागे प्राध्यापकवर्गाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची निष्ठा, सृजनशीलता आणि संघभावनेचा सुंदर संगम दिसून येतो. आदर्श पदवी महाविद्यालयाने या विजयाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

Comments (0)
Add Comment