जिल्हयात पुरेशी ऑक्सिजन बेड्स व रेमडिसीवर उपलब्ध होणार – पालकमंत्री एकनाथ शिंदे

जिल्हयातील कोरोना स्थितीचा घेतला आढावा

  • स्थानिक आमदारांनीही ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटर व रुग्णवाहिकेसाठी निधी देण्याचे केले मान्य
  • मुख्यालयासह व तालुक्यातही ऑक्सिजन जनरेटर प्लान्ट
  • नगरपालिकांना प्रत्येकी 5 कोटी रु. कोविड उपाययोजनांसाठी तातडीचा निधी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २३ एप्रिल: पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हयात ऑक्सिजन पुरवठा, बेड्सची नव्याने निर्मिती करण्यासह रेमडीसीवर औषधांच्या पुरवठयाबाबत तातडीने मंजूऱ्या मिळतील अशी ग्वाही दिली. जिल्हयाच्या ऑक्सिजन, रेमडीसीवर व इतर औषधांचा मंजूर व अतिरीक्त कोठ्यासाठी पालकमंत्री यांनी मुख्यमंत्री तसेच संबंधित सचिवांना दूरध्वनी द्वारे मागणी केली. यावेळी जिल्हयात तातडीने सदर मागणी पुर्ण केली जाईल असे ते यावेळी म्हणाले. गडचिरोली जिल्हयातील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता त्यांनी आज आरोग्य विभागासह जिल्हयातील महत्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री यांनी जिल्हयातील ऑक्सिजन बेड वाढविणे आवश्यक असल्याचे सांगून यासाठी आवश्यक ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प तातडीने बसवून पुर्ण करा अशा सूचना दिल्या. यामध्ये येत्या आठवड्यात गडचिरोली सामान्य रूग्णालयातील २६५ सिलेंडरचा ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प सुरू होत असून दुसरा 135 सिलेंडरचा ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प सुरू करत आहोत असे जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली. पालकमंत्री यांनी यावेळी भविष्यातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेवून सिरोंचा, आरमोरी, चामोर्शी, कुरखेडा, वडसा, कोरची व एटापल्ली या ठिकाणी सुद्धा कमी क्षमतेचे ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प सुरू करणेबाबत निर्देश दिले.

पालकमंत्री यांनी रूग्णांचे ऑक्सिजन वाचून मृत्यू रोखण्यासाठी तालुकास्तरावर ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटर खरेदी करण्याच्या सूचना केल्या. सदर ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटरचे वाटप तालुकास्तरावरील कोरोना रूग्णालयात तातडीने केले जाणार आहे. जिल्हयात ऑक्सिजन बेड्स वाढवणे आवश्यक असून त्याप्रमाणे सिरोंचा, वडसा अशा ठिकाणी तातडीने ती वाढवावित असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून २०० रेमडीसीवर : पालकमंत्री यांनी २०० रेमडीसीवर इंजेक्शन्स आरोग्य विभागाकडे सुपूर्द केली. यावेळी ते म्हणाले की, कोरोना रूग्णांची जास्त औषधे घेण्याची इच्छा असते मात्र डॉक्टरांनी आवश्यक असलेल्यांनाच रेमडीसीवर किंवा कोणतेही इतर उपचार द्यावेत. संपुर्ण देशासह राज्यात ऑक्सिजन म्हणा किंवा रेमडीसीवर सारख्या औषधांचा तुटवडा आहे. उपलब्ध साठा गरजूंना मिळेल यासाठी आरोग्य विभागाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे असे ते पुढे म्हणाले.

आमदार ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटर व रुग्णवाहिकेसाठी देणार निधी :  जिल्हयातील आमदारांनी प्रत्येकी एक-एक कोटी रूपये निधी ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटर व रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर पालकमंत्री यांनी सर्वांचे स्वागत केले. यातून तालुका स्तरावरती ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटर व रुग्णवाहिका कोरोना काळासाठी महत्वाचे योगदान देतील असे प्रतिपादन पालकमंत्री यांनी यावेळी केले.

प्रत्येक नगरपालिकेला कोटी कोरोना निधी : नगरपालिकांच्या माध्यमातून कोविड नियंत्रणासाठी अनेक प्रकारची कामे होत असतात. शहरात कोविड रूग्ण संख्या मोठया प्रमाणात असते. यासाठी विविध तातडीच्या उपाययोजना राबविण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच पाच कोटी रूपये आकस्मिक निधी देण्याचे जाहीर केले.

नगरपरिषद गडचिरोलीला सेवाभावी डॉक्टरांच्या दवाखान्यासाठी निधी : गडचिरोली शहरातील सेवाभावी डॉक्टरांनी प्रशासनाकडे १०० बेडसाठी कोविड दवाखाना सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी आवश्यक निधी नगरपालिका प्रशासनाला उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन पालकमंत्री यांनी यावेळी दिले. दवाखान्यासाठी आवश्यक तरतुदींची तपासणी करून सदर १००  कोविड बेडच्या हॉस्पीटलला आरोग्य विभागाने मंजूरी प्रदान करावी अशा सूचना पालकमंत्री यांनी केल्या. सदर दवाखान्यासाठी नगरपरिषदेला दिलेला निधी हा संपूर्ण दवाखान्याच्या व्यवस्थापनासाठी खर्च करण्यात येणार आहे. हा निधी नगरविकास विभागाकडून देण्यात येणार आहे.

CEO Kumar AshirwadDipak SinglaEknath Shinde