क्रीडा प्रबोधिनीसाठी प्रवेशाची संधी; २३ जूनपर्यंत अर्ज करा!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १९ : राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत स्थापन करण्यात आलेल्या क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशासाठी खेळाडूंना संधी देण्यात येत असून, यासाठी २३ जून २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील नऊ क्रीडा प्रबोधिन्यांमध्ये विविध खेळप्रकारांतील गुणवत्ता असलेल्या पात्र खेळाडूंसाठी २६ ते २७ जून दरम्यान विभागीय स्तरावर कौशल्य चाचण्या घेतल्या जाणार असून, त्यातून निवड झालेल्या खेळाडूंना पुढील राज्यस्तर चाचणीसाठी संधी मिळणार आहे.

या वर्षी हँडबॉलसाठी १३, जलतरणसाठी ७, सायकलिंगसाठी ३, फुटबॉलसाठी ७, ज्युदोसाठी ५, तर जिम्नॅस्टिकसाठी ९ रिक्त जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ७ जुलै २००६ नंतर जन्मलेले आणि ८ जुलै २०२५ रोजी १९ वर्षांखालील वयोगटात असलेले खेळाडू या प्रक्रियेस पात्र ठरणार आहेत.

या प्रबोधिन्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंना शासनामार्फत निवासी प्रशिक्षण, दर्जेदार शालेय शिक्षण, संतुलित आहार, निवास व्यवस्था तसेच आधुनिक क्रीडा सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत.

राज्यस्तरावर पदक विजेते किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या खेळाडूंना थेट तज्ज्ञ समितीसमोर सादरीकरणाच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. तर राज्यस्तरावर फक्त सहभागी असलेल्या खेळाडूंना कौशल्य चाचणीच्या आधारे गुणवत्तेनुसार संधी मिळणार आहे.

या प्रक्रियेसाठी इच्छुक खेळाडूंनी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कॉम्प्लेक्स एरिया, गडचिरोली येथे २३ जूनपर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.