लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई : २०२४ मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरगोस बहुमत मिळाले असून महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल १० दिवसानंतर १५ डिसेंबरला नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. या हिवाळी अधिवेशनापूर्वी किंवा त्यादरम्यान खातेवाटप होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशीरा खातेवाटप जाहीर करण्यात आले असून खातेवाटपानंतर मिळालेल्या खात्यावर समाधानी नसलेल्या अनेक मंत्र्यांची पालकमंत्रिपदासाठी जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे.
महायुती सरकारच्या खातेवाटपात देवेंद्र फडणवीसांनी स्वत:कडे गृह, ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून), विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क विभाग आणि इतर मंत्र्यांना नेमून न दिलेली उर्वरित खाती ठेवली आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि गृहनिर्माण या दोन महत्त्वाच्या खात्यांसह सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ आणि नियोजनसह राज्य उत्पादन शुल्क खाते देण्यात आले आहे. महायुतीकडून खातेवाटप झाल्यानंतर आता अनेक मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु केले आहे.
सध्या महायुतीत पालकमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमत्रिपदावर अदिती तटकरे व मंत्री भरत गोगावले यांनी दावा केला आहे. तर बीडमध्ये धनंजय मुंडे की पंकजा मुंडे पालकमंत्री होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट की अतुल सावे यांच्यात पालकमंत्रिपदासाठी स्चीपर्धा सुरु झालेली असून पालकमंत्रिपद कुणाला मिळणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.