लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, ९ ऑगस्ट : शेती ही केवळ उदरनिर्वाहाची नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीची आधारशिला आहे, या संदेशाने गडचिरोलीत काल शेती दिन साजरा झाला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत कृषी क्षेत्रातील नवनवीन संधी, तंत्रज्ञान आणि योजनांची माहिती देत शेतकऱ्यांच्या हंगामी तयारीला नवचैतन्य मिळाले.
कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहात भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, कृषी उपसंचालक कुमारी मधुगंधा जुलमे, उपविभागीय कृषी अधिकारी धर्मेंद्र गिरीपुंजे, तसेच परांजपे आणि वसवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात झाली.
या कार्यशाळेत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, पोकरा अंतर्गत शेती शाळा, खरीप हंगामातील पिकांवरील कीड-रोग व्यवस्थापन, तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू व फळबाग लागवडीचे महत्त्व अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेंतर्गत ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी श्रीमती योगिता सानप यांनी आभासी माध्यमातून संवाद साधत, गडचिरोलीतील रानभाज्या व वनोपज यांचे प्रक्रिया करून मूल्यवर्धन करण्याच्या संधी अधोरेखित केल्या.
पोकरा अंतर्गत शेती शाळेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मंडळ कृषी अधिकारी भूषण देशमुख यांनी दिशा-निर्देश दिले, तर कुरखेड्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी सरदार यांनी सामूहिक खेळ व गटचर्चेचे प्रात्यक्षिक सादर केले. खरीप हंगामातील प्रमुख पिकांवरील कीड, त्यांची आर्थिक नुकसान पातळी आणि व्यवस्थापना विषयी कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ज्ञ पुष्पक बोथीकर यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
बांबू लागवड, फळबाग आणि मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात तंत्र अधिकारी (फलोत्पादन) आनंद कांबळे यांनी माहिती दिली, तर प्रीती हिरळकर यांनी जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेत “नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना” विषयी तपशीलवार माहिती दिली.
कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेती दिनाचे औचित्य साधून या कार्यशाळेने शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांना नवउर्जा दिली, तर आधुनिक कृषी विकासाची नवी दिशा ठरली.