लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
“ शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आजही बहुजन समाजाला दिशा दाखवतो. त्याच संदेशाचे मूर्त रूप म्हणून आज आलापल्ली येथील संघमित्रा बुद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभेची नवी अहेरी तालुका कार्यकारिणी स्थापन झाली. हा क्षण केवळ पदनियुक्तीचा नसून – बहुजन समाजाच्या हक्क आणि न्यायासाठीची नवी संघटित सुरुवात आहे…
अहेरी ता.प्र : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्धधम्माच्या विचारसरणीचा जागर आजही समाजात तितकाच प्रभावी आहे. याच विचारांच्या धारेवर सामाजिक न्याय, समता आणि संघटिततेच्या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभेची अहेरी तालुका कार्यकारिणी औपचारिकरीत्या गठीत करण्यात आली. हा ऐतिहासिक उपक्रम आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी आलापल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, संघमित्रा बुद्ध विहार येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष दामोदर राऊत होते. या प्रसंगी बानाय्या मदनय्या दुर्गम यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड सर्वानुमते करण्यात आली. त्याचबरोबर प्रा.प्रमोद मेश्राम सरचिटणीस, वामन हरिदास भगत उपाध्यक्ष, दामोदर झाडे उपाध्यक्ष, सचिन तुळशीराम करमे प्रचार व पर्यटन, प्रशांत सरकाटे कार्यालयीन सचिव, बाबुराव चापले सचिव – संरक्षण, नंदेश्वर लक्ष्मण मेश्राम उपाध्यक्ष – संरक्षण, सचिन कांबळे सचिव – संस्कार, अविनाश सुरेश कोंडार्गुला सचिव – संस्कार, शंकर जोगा झाडे सचिव – प्रचार व पर्यटन, व्यंकटी राजा बोरकुट सचिव – संरक्षण, प्रताप बंडू आलोने सचिव – प्रचार व पर्यटन, तसेच अनेक पदाधिकारी व संघटक यांची निवड करण्यात आली.
या वेळी उपस्थित बहुसंख्य बौद्ध बांधवांनी टाळ्यांच्या गजरात नवीन कार्यकारिणीचे स्वागत केले. महासभेच्या या उपक्रमाचे स्वरूप केवळ पदनियुक्तीपुरते मर्यादित नसून बहुजन समाजाला संघटित करण्याचे, अन्यायाविरोधात उभे राहण्याचे, तसेच सामाजिक-शैक्षणिक उन्नती साधण्याचे हे एक सशक्त पाऊल मानले जात आहे.
समाजात समता, बंधुता आणि बौद्ध मूल्ये रुजविण्यासाठी महासभेचे कार्य ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. ग्रामीण व आदिवासी भागातील वंचित समाजाला न्याय आणि अधिकार मिळवून देणे, त्यांच्या मुलांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि सामाजिक बांधिलकी दृढ करणे हे या समितीचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.
ही कार्यकारिणी म्हणजे केवळ पदांची मांडणी नव्हे, तर बहुजन समाजाच्या न्यायासाठीची संघटित सुरुवात आहे,असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अहेरी तालुक्यातील या नव्या संघटनात्मक घडामोडीमुळे स्थानिक समाजात उत्साहाचे वातावरण असून, यापुढील काळात महासभा अधिकाधिक सामाजिक परिवर्तनाचे काम हाती घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा,
जिल्हा परिषद शाळेतून घडलेला आलापल्लीचा मृणाल – दंतवैद्यकात चमकदार यश