लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रवि मंडावार,
गडचिरोली : आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली तीन वर्षे सुरू असूनही संथ गती, ठेकेदाराची निष्क्रियता आणि प्रशासनाचा बेफिकीरपणा यामुळे हा मार्ग आजही खड्डेमय व चिखलमय अवस्थेत आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर अक्षरशः चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून जड वाहनांसाठी प्रशासनाने घातलेली वाहतूक बंदी फक्त नावालाच आहे. नियमांना चुकवून सतत धावणारी अवजड वाहने रस्त्याची आणखी वाट लावत आहेत. परिणामी छोटे–मोठे वाहनं चिखलात फसतात आणि तासन्तास वाहतूक ठप्प राहते. शासनाने उभारलेले बंदीचे बॅनर हे देखील फसवे ठरत असल्याचे वास्तव आहे.
तालुक्याच्या मध्यवर्ती अहेरी सारख्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. शैक्षणिक, व्यापारी आणि आरोग्यविषयक कामांसाठी होणारी ये–जा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. विशेषतः गरोदर माता, आपत्कालीन रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांचे हाल तर अधिकच वाढले असून वेळेवर रुग्णालयात पोहोचता न आल्याने जीव गमावण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. “रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?” हा गोंधळच निर्माण झाला आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आविष्यात पांडा यांनी या प्रश्नावर प्रशासनाला ताशेरे ओढले होते. सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत चर्चाही झाली. मात्र, बैठकीतील फक्त कागदी चर्चा आणि आश्वासनांपलीकडे प्रत्यक्ष काम शून्यच असल्याने जनतेचा संयम सुटत आहे.
दरम्यान, या मार्गावर गेल्या काही वर्षांत अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांत साचलेल्या पाण्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिकच भीषण बनले आहे. शासन–प्रशासनाची उदासीनता पाहता, “या मार्गावरून एकदाच प्रवास करून दाखवा, मग जनतेची व्यथा समजेल,” असे बोचरे आव्हान नागरिकांनी लोकप्रतिनिधींना दिले आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली खड्ड्यांचा व चिखलाचा मार्ग नागरिकांच्या सहनशीलतेला आव्हान देत आहे. या मार्गाच्या दुरवस्थेवर तातडीने ठोस पावले उचलणे, हे आता शासन–प्रशासनासाठी अनिवार्य ठरले आहे.