लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रवि मंडावार धानोरा : धानोरा शहरात एका ॲम्बुलन्सने समोरून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. या भीषण अपघातानंतर ॲम्बुलन्स चालक वाहनासह फरार झाला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भगचंद माणिक लीलारे (वय २८, रा. बालाघाट) हा युवक आपल्या दुचाकीवरून (चातगाव रोडमार्गे) धानोरा शहराकडे जात होता. दरम्यान, सर्च चातगाव हॉस्पिटलची ॲम्बुलन्स (क्र. MH33 T4834) ही रुग्णांना घेऊन जात असताना भरदुपारी एसबीआय बँकेसमोरील चौकात समोरासमोर धडक झाली. या भीषण धडकेत भगचंद लीलारे यांना डोक्याला गंभीर मार लागला होता धानोरा शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
सध्या धानोरा शहरात महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे वनवे वाहतूक लागू करण्यात आली आहे. मात्र, या वाहतूक नियमानाकडे दुर्लक्ष करत ॲम्बुलन्स चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवले, अशी स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया आहे.
अपघातानंतर ॲम्बुलन्स चालकाने घटनास्थळावरून वाहनासह पलायन केले. घटनेची माहिती मिळताच धानोरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी धानोरा ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
शवविच्छेदनानंतर मृताचे पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले असून, याप्रकरणी ॲम्बुलन्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू करण्यात आला आहे.
धानोरातील महामार्गाच्या कामामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत या कामामुळे अपघाताचे संख्या पण वाढले. जीव वाचवणारा ॲम्बुलन्स आज एका युवकाचा जीव घेतला पोलीस याची सखोल चौकशी करणार का हा प्रश्नचिन्ह सध्या सामान्य नागरिकाच्या मनात आहे.