प्रादेशिक परिवहन विभागाकडून नागरिकांकरीता रुग्णवाहिकेचे दर निश्चित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २७ एप्रिल: कोरोना महामारीच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण परिसरात राहणाऱ्या नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी आणि रुग्णांना अत्यंत सुलभ दरात तातडीने सेवा उपलब्ध व्हावी याकरिता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने दि. २० डिसेंबर २० नुसार पुढीलप्रमाणे रुग्णवाहीकांचे दर निश्चित केलेले आहेत.

            १०० कि.मी. किंवा २४ तासाकरीता रुग्णवाहीकांचे भाडेदर हे पुढील प्रमाणे आहेत. मारुती -१५०० रु., टाटा सुमो- १७०० रु., विंगर- १९०० रु., ट्रॅव्हलर – २००० रु. वातानुकुलीत यंत्रणा वाहनात बसविली असल्यास नमुद दरामध्ये १० टक्के वाढ राहणार आहे. तसेच त्यानंतर प्रति कि.मी. दर पुढीलप्रमाणे असतील मारुती- ९ रु., टाटा सुमो- १० रु., विंगर – ११ रु., ट्रॅव्हलर- १३ रु., वातानुकुलीत यंत्रणा वाहनात बसविली असल्यास नमुद दरामध्ये १० टक्के वाढ.हायटेक किंवा अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्जीत रुग्णवाहीकांचे दर वर नमुद दरामध्ये ५० टक्के वाढ असेल. व डॉक्टर आणि नर्सिंग स्टॉफ यांच्याकरिता येणारा खर्च जी व्यक्ती किंवा संस्था रुग्णवाहीका भाडयाने घेईल त्यांना करावा लागेल.

            उपरोक्त नमुद करण्यात आलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारण्यात येऊ नये. तसे निदर्शनास आल्यास किंवा तशी तक्रार प्राप्त झाल्यास सदर रुग्णवाहीका ज्या व्यक्तीच्या नावाने नोंदणीकृत असेल त्या व्यक्तीवर किंवा संस्थेवर व वाहनावर मोटार वाहन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत सर्व नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.