जेप्रा येथे वाघाच्या हल्यात एक इसम ठार

गडचिरोली जिल्हात वाघांच्या हल्यात बळींची संख्या पोहोचली १४ वर. वन विभाग कधी वाघाला जेरबंद करणार? स्थानिक नागरिकांत आक्रोश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली ११ सप्टेबर: गडचिरोली तालुक्यातील जेप्रा येथील गणपत भांडेकर या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याने आतापर्यंत वाघाच्या हल्यात ठार  झालेल्यांची संख्या १४ वर पोहोचली आहे.

जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या जेप्रा या गावातील आज दुपारी बाराच्या सुमारास एक पुरुष व एक महिला गावालगत असलेल्या झुडपी जंगलात बकऱ्या चारण्यासाठी घेऊन गेले असता जंगलात दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाने अचानक हल्ला करून ठार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत प्रत्यक्षदर्शी सोबत असलेल्या महिलेने माहिती दिली आहे.

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव गणपत भांडेकर  मोल मजुरी करून तसेच गावातील बकऱ्या चारून आपला प्रपंच चालवीत होते. मात्र आज सकाळी जंगलात बकऱ्या चरायला  गेला असता त्याच्यावर वाघाने हल्ला केल्याने घरातल्या कर्त्या व्यक्तीचा बळी घेतल्याने जेप्रा या गावातील लोकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सदर घटनेची माहिती गडचिरोली पोलिस ठाणे व वन विभागात दिली असल्याची माहिती दिली आहे. मृतक भांडेकर यांच्या कुटुंबात पत्नी तीन मुले सुना नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार असून वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांची संख्या आता १४ वर पोहोचली आहे.  या नरभक्षक वाघाला  वन विभाग केव्हा  जेरबंद करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

gadchiroliforestjepratigerattack