राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आरमोरीत सामाजिक जागृतीचा उद्घोष

जातीय सलोखा, लोकशाही व संविधान रक्षणाचा संदेश मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे आयोजन...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी (जि. गडचिरोली), २६ जून : बहुजनांच्या सामाजिक उत्थानाचा इतिहास घडविणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५६व्या जयंतीनिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आरमोरी येथे ‘जातीय सलोखा आणि लोकशाही रक्षण’ या विषयावर सखोल विचारमंथन करत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक समतेचा विचार रुजविण्याचा आणि संविधान मूल्यांचे भान ठेवण्याचा या कार्यक्रमामागे प्रयत्न होता.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. जयकुमार मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून धर्मानंद मेश्राम, अ‍ॅड. सोनाली मेश्राम, राज बन्सोड, राजु सातपुते, डॉ. धर्मराज सोरदे, विठ्ठल प्रधान, लकी पाटील, सतीश दुर्गमवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मान्यवरांनी शाहू महाराजांच्या क्रांतिकारी कार्यावर प्रकाश टाकताना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक धोरणांची आठवण करून दिली. त्यांनी अस्पृश्यता, वर्णभेद, धर्मांधता या सामाजिक कुरूपतेवर प्रहार करून बहुजन समाजाच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. आजच्या विषारी जातीय-धार्मिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांचे विचार अधिकच समर्पक वाटतात, असे विचार व्यक्त करण्यात आले.

वर्तमान काळात लोकशाही टिकवण्यासाठी आणि सामाजिक सौहार्द राखण्यासाठी संघर्षाचे नव्हे तर प्रगल्भ शिक्षण, विचार आणि एकात्मतेचे वर्तन हाच मार्ग असल्याचे मत वक्त्यांनी मांडले. जाती-जमातीत दुही निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात शाहू महाराजांचा आदर्श व संविधान हेच शस्त्र आहे, असा एकमुखी सूर यावेळी उमटला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माकपचे जिल्हा सचिव अमोल मारकवार यांनी पक्षाच्या ऐतिहासिक भूमिका, सामाजिक लढ्यांची परंपरा, आणि सध्याच्या राजकीय वातावरणात पक्षाची दिशा यावर प्रभावी भाष्य केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रितेश अंबादे यांनी तर आभार प्रदर्शन विठ्ठल प्रधान यांनी केले. कार्यक्रमानंतर उपस्थित कार्यकर्त्यांसाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम केवळ जयंती पूजनापुरता मर्यादित न राहता, सामाजिक बदलाची एक प्रेरणादायी चळवळ ठरणार असल्याचा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला.