बिबट्याचे कातडे विक्री प्रकरणात आणखी एका आरोपीची भर

  • वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आज केली पुन्हा एका आरोपीला अटक
  • आरोपीची संख्या पोहचली सहावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी, दि. १९ एप्रिल:. बिबट्याचे कातडे व नखे विक्री प्रकरणातील पाच आरोपीना वनविभागाने गुरुवारी  जेरबंद केले होते. या प्रकरणाशी संबंधित पुन्हा एका आरोपीला वनविभागाचे अधिकाऱ्यांनी मोठया शिताफीने ताब्यात घेऊन रविवारी अटक केली असल्याने आरोपीची संख्या सहावर पोहचली आहे. आज अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अरुण काशीनाथ खंडारे (४०)  रा. गांगुली असे आहे. या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार असल्याचे समजते.

आरमोरी येथील बिबट्या चे कातडे व नखे विक्रीसाठी बाळगल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरमोरी सह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे धागेदोरे कोठ पर्यन्त पोहचले आहे याचा कसून शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत. आरोपी कडून बिबट्या चे कातडे व नखे यापूर्वीच जप्त करण्यात आली होती.

आरोपी कडून सापडलेले बिबट्या चे कातडे काढण्यात आले ते घटनास्थळ कुरखेडा वनपरिक्षेत्रातील घाटी नियत क्षेत्र २९७ मधील जंगल परिसरातील  घटनास्थळ आहे.  सदर घटनास्थळी अर्धवट जळलेल्या स्थितीत बिबट्या चे सांगाळे मिळाले असून वनविभागाचे अधिकारी यांनी  घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच बिबट्या चे कातडे काढण्यासाठी वापरण्यात आलेली सूरी आरोपीकडून जप्त करण्यात आली .

सदर बिबट्याची शिकार करण्यात आली की सदर बिबट इतर कारणामुळे मृत पावला याचाही शोध वनविभागाचे अधिकारी घेत असून घटनास्थळी सापडलेले सांगळे हे त्याच बिबट्या चे आहेत का? याचे नमुनेही तपासणीसाठी हैद्राबाद येथील लॅब मध्ये पाठविले जाणार आहे

या बिबट्याची शिकार पाच सहा महिन्यांपूर्वी कुरखेडा वनपरिक्षेत अंतर्गत येणाऱ्या घाटी गांगुली च्या जंगलात करण्यात आली असल्याचे स्पष्ट होते. मात्र शिकार करणारा मुख्य आरोपी व त्यात सहभागी असणारे अनेक जण फरार असल्याचे कळते मात्र वनविभागाचे अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत. कुरखेडा वनपरिक्षेत्र शिकारीची घटना घडूनही त्याची साधी कुणकुण तेथील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना माहीत न होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. या शिकार प्रकरणातील मुख्य आरोपी मिळल्या नंतर सदर घटनेचे धागेदोरे माहीत होणार आहेत.

आज अटक केलेला सहावा आरोपी हा  कुरखेडा तालुक्यातील गांगुली येथील असून जेव्हा बिबट्या ची शिकार करण्यात आली तेव्हा त्या आरोपीने त्याचे चामडे व अवयव काढण्याचे काम केले होते. सदर आरोपीकडून माहिती घेण्याचे काम वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत आहे.

leopard hunter