सिंदेवाहीत पुन्हा टस्कर रानटी हत्तीचा कहर; वृद्धाला चिरडून केले ठार

शौचासाठी गेलेल्या इसमावर टस्कर हत्तीचा हल्ला; वनविभागाच्या निष्क्रियतेवर जनतेचा रोष..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

सिंदेवाही (जि. चंद्रपूर), १५ जून:  तालुक्यात पुन्हा एकदा टस्कर रानटी हत्तीने दहशत निर्माण केली असून, रविवारी सकाळी जाटलापूर येथील एका वृद्ध इसमावर हल्ला करून त्याला जागीच ठार केले. मृत इसमाचे नाव मारोती कवडू मसराम (वय ७०, रा. जाटलापूर मोठा) असे असून, ते सकाळी शौचासाठी घराबाहेर गेले असताना ही घटना घडली.

ओडिशामधून छत्तीसगड मार्गे गडचिरोलीत दाखल झालेल्या दोन टस्कर हत्तींचा गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांमधील वावर वाढत चालल्याचे दिसून येते. ३० मे रोजी सिंदेवाही तालुक्यात प्रवेश केलेल्या या हत्तींचा काही काळ गडचिरोलीकडे परतीचा प्रवास झाला होता. मात्र १३ जून रोजी पुन्हा सावली तालुक्यात आढळून आल्यावर त्यांनी सिंदेवाही तालुक्यात आगेकूच केली असून, त्याच दरम्यान रविवारी पहाटे ६ वाजता ही प्राणघातक घटना घडली.

हत्तीने थेट मसराम यांच्यावर हल्ला करून त्यांना चिरडले. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, सिंदेवाही येथे हलवण्यात आला आहे.

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी वनविभागाच्या निष्क्रियतेवर जोरदार संताप व्यक्त केला आहे. हत्तींच्या हालचालींची पूर्वकल्पना असूनही त्यांचे नियंत्रण वा रोखथाम करण्यासाठी वनविभागाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “हत्ती येतात, जीव जातात आणि नंतर केवळ पंचनामे होतात. सतर्कतेसाठी कोणतीही यंत्रणा नाही,” अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.

सिंदेवाही तालुका व गडचिरोली सीमेलगत असलेल्या भागात अनेक आदिवासी वस्ती आहेत. या भागांतील नागरिकांना शौचालयांची अनुपलब्धता, जंगलालगत वास्तव आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे दररोज जंगलाच्या दिशेने जावे लागते. या पार्श्वभूमीवर रानटी हत्तींचा धोका अधिक गंभीर ठरत आहे.

विशेष म्हणजे, अशा प्राणघातक घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी शासनाच्या वतीने कोणतीही दीर्घकालीन रणनीती राबवलेली नाही. हत्तींच्या स्थलांतर मार्गाची वैज्ञानिक नोंद घेऊन त्या मार्गावरील गावांमध्ये सतर्कता आणि वनविभागाच्या तातडीच्या यंत्रणा कार्यरत ठेवणे ही काळाची गरज असल्याचे जाणकार सांगतात.

हत्ती नियंत्रणासाठी प्रशिक्षित पथक, जीपीएस ट्रॅकिंग, सायरन अलर्ट सिस्टीम आणि ग्रामपातळीवरील जनजागृती यासारख्या उपाययोजना राबविल्या जात नसल्याने प्रत्येक वर्षी अशा घटना घडत असून त्यात निष्पाप नागरिक बळी जात आहेत.

Forest DepartmentShindewahiTakkar elephant kill manटक्कर हत्तीटक्कर हत्ती हौदोस