लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : सीटू संलग्नित आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना यांच्यावतीने आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोली प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांच्याकडे १४ जानेवारी रोजी निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या.
नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे गडचिरोली प्रकल्प अध्यक्ष देव बन्सोड तसेच अनुदानित आश्रमशाळा संघटनेचे विभागीय सहसचिव विकास जनबंधू यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांनी निवेदनातील मागण्या व मुद्दे जाणून घेतले. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, डॉ. प्रभू सादमवार तसेच प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
निवेदनात शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना ४३०० ग्रेड वेतनानुसार व अनुदानित आश्रमशाळेतील माध्यमिक शिक्षकांना ४८०० ग्रेड वेतनानुसार सुधारित एकस्तर वेतन निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या १ तारखेला अदा करण्यात यावे, संबंधित कर्मचाऱ्यांना १,५०० रुपये आदिवासी प्रोत्साहन भत्ता लागू करून त्याची थकबाकी देण्यात यावी, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे पुनर्जीवित करून रिक्त पदे भरावीत, विद्यार्थी प्रवेश भरतीच्या कारणाने रोखलेल्या वार्षिक वेतनवाढी लागू कराव्यात, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करावी, तसेच महिला सफाईगार, महिला चौकीदार व सुरक्षा रक्षकांची पदे भरावीत, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
यासोबतच काही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक समस्याही निवेदनाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.शिष्टमंडळात संघटनेचे प्रकल्प सचिव ज्ञानेश्वर घुटके, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रतिनिधी संतोष धोटे, रमेश कोरचा, सचिन खोब्रागडे, वाय. बी. गोंगल, सुनीता मस्के, किसनदेव टिकले, ए. एम. नरुले, राजू मेश्राम, गिरीधर पातेवार, पुरुषोत्तम डोंगरवार, अविनाश डुड्डूल, सुधीर भोयर, बालकिसन चिंतल, प्रमोद शेबे, रमेश राऊत, खुशाल नाकाडे यांच्यासह शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे कर्मचारी उपस्थित होते.