लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,
अहेरी,12 सप्टेंबर 2023 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत 11 शासकीय व 15 अनुदानित तसेच एकलव्य शाळेतील उल्लेखनीय कार्य करणारे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांचा वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते दिनांक 12 ऑगस्ट 2023 ला प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रत्येक शाळेतून उपक्रमशील शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती मागविण्यात आली आणि त्यामधून उत्कृष्ट शिक्षक व विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
भविष्यवेधी शिक्षण प्रणालीनुसार शाळास्तरावर अमलबजावणी तसेच शाळेचे प्रशासन व व्यवस्थापन उत्कृष्टरित्या चालविल्याबद्दल एम. ए. खलीक, माध्यमिक मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा जीमलगट्टा यांना गौरविण्यात आले. कु. के. एन. वाघाडे, प्राथमिक शिक्षिका, शासकीय आश्रमशाळा पेरमिली यांनी इयत्ता दुसरीचे विद्यार्थी गणितातील मूलभूत क्रिया वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकतात हे सिद्ध करून दाखविले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एकलव्य रेसिडेन्शिअल स्कूल, अहेरी येथील इयत्ता बारावीची विद्यार्थिनी कु. खंजू युवराज पेंदाम हिने राज्यस्तरीय तसेच राष्ट्रस्तरीय वादविवाद स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त केलं त्याबद्दल या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. तसेच अनुदानित आश्रमशाळा किष्ठापूर येथील इयत्ता सातवी ला असलेली विद्यार्थिनी कु. रविता राजू आलाम हिचा 100 पर्यंतच्या संख्येचा पाढा तयार करण्याची पद्धत तसेच चार अंकी संख्येचा भागाकार व गुणाकार कमी वेळेत करण्याची कला अवगत केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच शासकीय आश्रम शाळा गुड्डीगुड्डम येथील इयत्ता नववीचा विद्यार्थी योगेश गिरमा कोडापे यास आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी व गणितातील काहीभाग आपल्या भाषेत समजावून विषय मित्राची भूमिका पार पाडल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,अहेरी अंतर्गत येणारे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी हे अद्ययावत असावे. तसेच अधिक जोमाने अध्ययन अध्यापनाचे कार्य करावे याकरिता प्रत्येक महिन्यामध्ये प्रकल्पांतर्गत तीन विद्यार्थी व दोन शिक्षकांचा सत्कार करण्याचे वैभव वाघमारे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांनी नियोजन केलेले आहे.