हत्तीरोग नियंत्रणासाठी धानोरा व रांगी येथे जनजागृती व उपचार किटचे वाटप

एमएमडीपी किट वितरणासह रुग्णांची तपासणी; आरोग्य विभागाच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

धानोरा: जागतिक हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि, ५ जून २०२५ रोजी धानोरा उपपथकांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा व रांगी येथे हत्तीरोग रुग्णांची तपासणी, पाय धुणे, तसेच एमएमडीपी (MMDP) किटचे वितरण करण्यात आले. यावेळी हत्तीरोगाबाबत जनजागृती करत प्रभावी नियंत्रण उपाययोजनांवरही मार्गदर्शन करण्यात आले.

आरोग्य विभागाच्या या उपक्रमात प्रत्यक्ष रुग्णांच्या सेवेसोबतच ग्रामस्तरावर हत्तीरोगासंबंधी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रुग्णांचे पाय स्वच्छ धुणे, त्यानंतर उपचार किट वाटप करणे आणि संक्रामकतेविषयी मार्गदर्शन हे या कार्यक्रमाचे प्रमुख घटक होते.

प्रशासनाची उपस्थिती आणि मार्गदर्शन..

कार्यक्रमाच्या वेळी कु. अदिती कोटांगले (आरोग्य पर्यवेक्षक, धानोरा), कुंमरे (आरोग्य विभाग, धानोरा), उंदीरवाडे (क्षेत्र कार्य, धानोरा), एस.बी. गेडाम (कारवाफा), डॉ. धुर्वे मॅडम (रांगी), श्रीमती शेंडे, आर.एल. जुमनाके (मोहली), टी.पी. भुजबळ (रांगी) व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपली भूमिका पार पाडत उपस्थितांना हत्तीरोगाची लक्षणे, संसर्गाची शक्यता, काळजी घेण्याचे उपाय, स्वच्छतेचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. या संवादामुळे गावकऱ्यांमध्ये रोगाविषयी जागरूकता वाढली असून रुग्णांमध्येही सकारात्मकता निर्माण झाली.

हत्तीरोग नियंत्रणासाठी सामूहिक जबाबदारीची गरज..

हत्तीरोग हा दीर्घकालीन आणि अपंगत्व आणणारा आजार असून त्याच्या नियंत्रणासाठी केवळ औषधोपचार नव्हे तर नियमित स्वच्छता, सामाजिक समज वाढविणे आणि स्थानिक प्रशासनाच्या पाठबळाचीही गरज असते. या अनुषंगाने राबवण्यात आलेला कार्यक्रम आरोग्यदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरला.

धानोरा व रांगी परिसरात अशा प्रकारची नियमित जनजागृती, तपासणी व उपचार किट वितरण मोहिमा सुरु राहिल्यास हत्तीरोगाच्या प्रसाराला अटकाव करता येईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

Health department gadchiroliहत्ती रोग