जिल्ह्यात लसीकरणासाठी सर्वस्तरावर जनजागृती करावी – मंत्री विजय वडेट्टीवार

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोविड-१९ बाबत घेतला आढावा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ०७ जून : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील दुर्गम भागात लसीकरणासाठी सर्वस्तरावर जनजागृतीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हा कोविड आढावा बैठकीत केले.

मंत्री विजय वडेट्टीवार आज जिल्हयात कोविड बाबत आढावा घेण्यासाठी आले होते. बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग स्थिती, लसीकरण मोहिम, म्युकर मायकोसिस या बाबत आढावा घेतला. जिल्हयात कोरोना संसर्ग नियंत्रित असून आता लसीकरणासाठी नागरिक, पदाधिकारी व प्रशासन यांनी मिळून कार्य केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या बैठकीत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी उपस्थितांना कोविड बाबत माहिती दिली. या बैठकीला  जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी विधानसभा अध्यक्ष तथा साकोली विधानसभा आमदार नाना पटोले, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर उपस्थित होते.

जिल्हयात १.७२ लक्ष कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात स्थानिक लोकांना सोबत घेवून त्यांचा आत्मविश्वास तयार करणे आवश्यक आहे. जनजागृती करून जास्तीत जास्त पात्र नागरिकांना लसीचे संरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे आमदार नाना पटोले यांनी मत व्यक्त केले. यानंतर जिल्ह्यातील म्युकर मायकोसिस रूग्ण व ऑक्सिजन पुरवठयाबाबत मंत्री महोदयांनी माहिती जाणून घेतली.

धान व मका खरेदी बाबत चर्चा : उपस्थित मंत्री व आमदार महोदयांनी जिल्हयातील उचल न झालेल्या धानाबाबत चर्चा करून लवकरात लवकर धान उचल करण्याच्या सूचना मिल मालकांना देणेत यावेत अशा सूचना केल्या. तसेच जिल्हयात मका उत्पादन मोठया प्रमाणात वाढले आहे त्याबाबत शासनाकडून खरेदी प्रक्रिया सुरू करता येईल का यावर या बैठकीत चर्चा झाली. मका हे उपयोगी असे खाद्य असून त्याचा वापर दैनंदिन आहारात करता येईल. जरी मक्यामूळे चव बदलली तरी आहारात त्याचे महत्त्व जास्त आहे. स्थानिक आशा कार्यकर्ती तसेच प्रशासनाकडून मका खाण्याचे फायदे लोकांना पटवून दिले तर जिल्हयातील मक्याचे झालेले उत्पन्न जिल्हयातच वापरता येईल यावरही बैठकीत चर्चा झाली.

हे देखील वाचा :

दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज एकही मृत्यू नाही, 95 कोरोनामुक्त तर 24 नवीन कोरोना बाधित

जिल्ह्यात खेरवाड़ी संस्थे मार्फत सेंद्रिय शेती कडे मोठे पाऊल

 

 

lead storyVijay Wadettiwar