५० हजाराची लाच मागणाऱ्या बीट निरीक्षकाला अटक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भिवंडी 17 नोव्हेंबर :- भिवंडी महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामांना बीट निरीक्षकांकडून पैसे घेऊन अभय देण्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. बेकायदा बांधकाम वाचवण्यासाठी प्रति स्लॅब ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मानपा प्रभाग समिती क्र. ३ च्या बीट निरीक्षकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका प्रभाग समिती ३ चे बीट निरीक्षक रमाकांत म्हात्रे यांनी एका अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तीकडून प्रति स्लॅब ५० हजार प्रमाणे ४ मजली स्लॅब करिता एकूण २ लाख रुपयांची मागणी केली होती, बोलणी करून तडजोड अंती केवळ ५० हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटले. बिट निरिक्षक रमाकांत म्हात्रे यांना ५० हजार रुपयांची लाच देण्याऐवजी अवैध बांधकाम करणाऱ्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या प्रकरणाची खातरजमा झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सुरेश चोपडे यांच्या पथकाने पद्मानगर भागात असलेल्या प्रभाग समिती ३ च्या कार्यालयावर सापळा रचून सफाई कामगार झालेले बीट निरीक्षक रमाकांत म्हात्रे यांना अटक केली. सुरेश चोपडे यांनी सांगितले की, रमाकांत म्हात्रे याने संबंधित व्यक्तीकडून ५० हजार रुपये स्वीकारले नसून, त्यांना लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सफाई कामगारातून अधिकारी झालेले रमाकांत म्हात्रे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अनेकवेळा निलंबित करण्यात आले आहे, मात्र अतिक्रमण व बेकायदा बांधकाम वसुली आदींमुळे त्यांना बीट इन्स्पेक्टरसारख्या मलाईदार पदावर ठेवण्यात आले आहे. रमाकांत म्हात्रे यांच्याप्रमाणेच मनपाचे पाचही विभागीय प्रभाग समित्यांचे बीट निरीक्षक आणि विभागीय अधिकारी अनधिकृत बांधकामांच्या बहाण्याने वसुली मोहीम राबवत असून, याला विभागीय अधिकाऱ्यांकडून उपायुक्तांपर्यंत मलाई पोचविले जात असल्याचे बेकायदेशीर बांधकाम धारकाकडुन बोलले जात आहे. भिवंडीतील वाढत्या बेकायदा बांधकामांचे मुख्य सूत्रधार म्हणजे महापालिकेचे विभागीय अधिकारी आणि बीट निरीक्षक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

हे पण वाचा :-