लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बीड, 29 मे :- जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घटसर्प, थायरेलेलीस सदृश्य साथीच्या आजाराने थैमान घातलं आहे. या आजारामुळं 150 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं आधीच लोक कोरोनाच्या संकटानं हैराण असताना मुक्या जनावरांवर संकट ओढावल्यानं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. लाख मोलाची दुभती जनावरं मरू लागल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलं आहे.
आष्टी तालुक्यातील तवलवाडी वाळुंज परिसरात 70 दुभत्या गाई आणि 80 वासरं मृत्यूमुखी पडली आहेत. साथीच्या आजाराची लक्षणे दिसून आल्यानंतर काही वेळातच गाईंचे मृत्यु होत आहेत. यामुळं भीतीचं वातावरण आहे. यासंदर्भात औरंगाबाद विभागीय पशू संवर्धन विभागाची टीम आष्टीत दाखल झाली आहे. मृत गायींचं शवविच्छेदन करून शरीरातील काही भागांचे नमुने भोपळच्या प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहे. जिल्हा पशुसंवर्धन प्रभारी डॉ. विनायक देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे.
तवलवाडी गावामध्ये 4 ते 5 दिवसांत तब्बल 60 संकरीत गाई आणि 80 च्या आसपास वासरं घटसर्प सदृश्य आजारानं दगावली आहेत. गाईंच्या मृत्यूमागचं नेमकं कारण शोधलं जात आहे. आधीच दुधाच्या घसरलेल्या दराने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.