लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 28: शासन निर्णयान्वये राज्यातील कोरोना विषाणू प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या 71,54,738 एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे 2020 ते ऑगस्ट 2020 या 4 महिन्यांच्या कालावधीकरीता सवलतीच्या दराने (गहू रु.8/- प्रतिकिलो व तांदूळ रु.12/- प्रतीकिलो) प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्याचा लाभ देण्यात आला आहे.
सदर योजनेअंतर्गत वितरीत करण्यात आलेल्या अन्नधान्याचा उचल व वाटपाच्या अहवालाचे अवलोकन केले असता असे निर्देशनास आले आहे की, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सदर योजनेतील अन्नधान्य शिल्लक आहे. सदर शिल्लक अन्नधान्याच्या वितरणाबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे.
जिल्ह्यामधील शासकीय गोदामांमध्ये तसेच रास्त भाव दुकानामध्ये शिल्लक असलेल्या अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) वाटप राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी), शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह प्रतिव्यक्ती 1 किलो गहू व 1 किलो तांदूळ याप्रमाणे 2 किलो अन्नधान्य माहे जून 2021 करीता सवलतीच्या दराने (गहू रु. 8/- प्रतिकिलो व तांदूळ रु.12/- प्रतिकिलो) वितरीत करण्यात यावे.
प्रथम मागणी करणाऱ्यास देणे (FIRST COME FIRST SERVED) तत्वानुसार वितरण करण्यात यावे. वितरणापूर्वी सदर अन्नधान्याची तपासणी करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत खराब किंवा मानवी खाण्यास अखाद्य अन्नधान्याचे वितरण होणार नाही याची उपनियंत्रक शिधावाटप/जिल्हा पुरवठा अधिकारी/ अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी दक्षता घ्यावी व तशा स्पष्ट सूचना रास्तभाव दुकानदारांना देण्यात याव्यात.
जिल्ह्यांमधील ज्या गोदामामध्ये सदर अन्नधान्य साठवूणक केले आहे त्याच तालुक्यामध्ये तसेच ज्या रास्त भाव दुकानांमध्ये सदर अन्नधान्य शिल्लक आहे त्याच रास्त भाव दुकानामध्ये सदर अन्नधान्याचे वाटप करावे.
तालुक्याच्या गोदामांमधील शिल्लक अन्नधान्य इतर तालुक्यामध्ये वाटपासाठी वाहतूक करुन अनावश्यक अतिरिक्त वाहतुकीचा आर्थिक भार शासनावर येणार नाही याची उपनियंत्रक/जिल्हा पुरवठा अधिकारी/अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. सोबतच्या विवरणपत्रातील अन्नधान्याच्या शिलकीच्या आकडेवारीनुसार वाटप करावयाचे आहे.
प्रत्यक्ष वाटप करताना त्या आकडेवारीमध्ये तफावत आढळल्यास जेवढी प्रत्यक्ष शिल्लक आहे. तेवढया अन्नधान्याचे वाटप करावे. ज्या रास्त भाव दुकानामध्ये सदर अन्नधान्य शिल्लक आहेत्या दुकानामध्ये माहे मे ते ऑगस्ट 2021 या कालावधीत सर्व लाभार्थ्यांना वाटप का करण्यात आले नाही.
याबाबत त्या दुकानाच्या नोंदवहीच्या आधारे चौकशी करावी. तसेच त्या दुकानास जोडलेल्या ज्या लाभार्थ्यांस अन्नधान्य दिले नसल्याचे नोंदवहीवरुन दिसून येईल. त्या लाभार्थ्यांस अन्नधान्याचा लाभ का देण्यात आला नाही याची शहानिशा आवश्यकता भासल्यास गृहभेटीद्वारे करण्यात यावी. प्रत्येक रास्त भाव दुकानातील किमान 5 लाभार्थ्यांच्या अशा गृहभेटी होतील याबाबत उपनियंत्रक शिधावाटप/ जिल्हा पुरवठा अधिकारी/ अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.
ज्या रास्त भाव दुकानामध्ये सदर अन्नधान्य शिल्लक नाही. त्या दुकानामधून माहे मे ते ऑगस्ट 2021 या कालावधीत सर्व लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले असल्याबाबत त्या दुकानाच्या नोंदवहीच्या आधारे खातरजमा करावी.
तसेच त्या दुकानास जोडलेल्या ज्या लाभार्थ्यांना अन्नधान्य दिले असल्याचे नोंदवहीवरुन दिसून येईल. त्या लाभार्थ्यांस अन्नधान्याच्या लाभ देण्यात आला आहे. याची शहनिशा आवश्यकता भासल्यास गृहभेटीद्वारे करण्यात यावी. प्रत्येक रास्त भाव दुकानातील किमान 5 लाभार्थ्यांना अशा गृहभेटी होतील याबाबत उपनियंत्रक शिधावाटप/ जिल्हा पुरवठा अधिकारी/ अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.
सदर शिल्लक अन्नधान्याचे वाटप करतांना वरील प्रमाणे कार्यवाही केल्यानंतर त्या रास्तभाव दुकानातून अन्नधान्याचे वाटप सुरु केले जाईल. नव्याने अन्नधान्याचे वाटप करताना मागील वेळेप्रमाणे नोंदवही ठेवणे अनिवार्य राहील.
यावेळी वाटप सुरु असतानाच प्रत्येक रास्तभाव दुकानातील किमान 5 लाभार्थ्यांच्या गृहभेटी घेण्यात येतील याबाबत उपनियंत्रक शिधावाटप/ जिल्हा पुरवठा अधिकारी/ अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.
तसेच जे लाभार्थी अन्नधान्याचा लाभ घेण्यास येतील त्यांना RCMS मध्ये (NPH मध्ये) नव्याने समाविष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून आवश्यक तपशिल प्राप्त करुन घेण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात. संपूर्ण वाटप झाल्यानंतर प्रत्यक्ष शिलकीची सुधारित आकडेवारी नमूद करुन संपूर्ण अन्नधान्याचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास तात्काळ सादर करण्या यावे असे शासनाचे सह सचिव यांनी कळविले आहे.
हे देखील वाचा :
जिल्हा स्थानिक तक्रार निवारण समितीत अध्यक्ष व अशासकीय सदस्यासाठी निवेदन
खाजगी कोविड रूग्णालयातील उपचाराबाबतच्या देयकांचे होणार लेखापरिक्षण