लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली | २५ जुलै २०२५ : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा सक्रिय झालेल्या पावसाने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. २३ जुलैपासून मुसळधार पावसाचा जोर सुरू असून, त्याचा पहिला गंभीर फटका भामरागड तालुक्याला बसला आहे. सलग पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून, परिणामी भामरागड तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क पूर्णतः खंडित झाला आहे.
दरवर्षी जूनच्या सुरुवातीला पूरस्थिती निर्माण होणाऱ्या या भागात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. मात्र २५ जुलैच्या पहाटेच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसामुळे पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहू लागली आणि भामरागडकडे जाणारा एकमेव मार्ग ठप्प झाला. पूल पूर्णतः जलमय झाल्यामुळे नागरिकांची हालचाल ठप्प झाली असून, पूरग्रस्त भागात तातडीच्या मदतीची आवश्यकता निर्माण झाली आहे.
हा पूल म्हणजे केवळ दळणवळणाचा मार्ग नव्हे, तर नक्षलग्रस्त भागातील जीवनवाहिनी आहे. यामुळे या संपर्क तुटण्याचे परिणाम आरोग्य, शिक्षण, प्रशासकीय मदत आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर ठरणार आहेत.
जिल्हा प्रशासन, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले असून सर्व बाबीचा आढावा घेतला जात आहे..