लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भंडारा दि,१७ : अंधेरी-पश्चिम, मुंबई येथे सुरू झालेल्या मराठी फॅशन वीक २०२५ मध्ये भंडाऱ्याच्या हस्तकला-परंपरेने अभिमानाने डोकं वर काढलं. महाराष्ट्राच्या वारशाला आणि आधुनिकतेच्या सौंदर्यभानाला एकत्र आणणाऱ्या या फॅशन उत्सवात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथील गोपीचंद निनावे यांच्या हातमागावर विणलेल्या टसर सिल्क करवत साडीचे मोहक सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली.
फॅशन वीकमध्ये विविध वस्त्र-प्रावरणांचे सादरीकरण झाले; मात्र सर्वांच्या नजरा खेचून घेतल्या त्या ग्रीष्मा हँडलूम्सच्या हातावर विणलेल्या टसर सिल्क करवत साडीने. शोच्या सुरुवातीलाच सादर झालेल्या या साडीने रॅम्पवर सौंदर्य, संस्कृती आणि परंपरेचा अद्वितीय संगम खुलवला. त्यानंतर ‘कापसे पैठणी’चे मनोहारी सादरीकरण झाले. महाराष्ट्राच्या विविध परंपरागत वेशभूषांना या फॅशन शोमध्ये विशेष स्थान देण्यात आले होते, तर मराठी कलावंतांनी शोस्टॉपर म्हणून कार्यक्रमाला वेगळेच अप्रूप प्राप्त करून दिले.
आंधळगावातील श्री. निनावे यांच्या हातमागावर तयार होणारी ही टस्सर सिल्क करवत साडी तयार करण्यास तब्बल १० ते १२ दिवस लागतात—प्रत्येक धाग्यात कौशल्य आणि परंपरेची छाप असलेला हा एक समृद्ध वारसा आहे. भंडाऱ्याच्या या साडीने मुंबईतील प्रतिष्ठित फॅशन शोमध्ये ठसा उमटवल्याने जिल्ह्याचे नाव झळाळून निघाले असून, निनावे यांच्या कलाकुसरीचे राज्यभर कौतुक होत आहे.
भंडाऱ्याच्या हस्तकला कौशल्याला मिळालेला हा सन्मान केवळ एका साडीपुरता मर्यादित नसून, ग्रामीण हातमागाच्या श्रमसौंदर्याची, परंपरेची आणि कष्टाचे सोनं करणाऱ्या कारागिरांच्या जगण्याचीही दखल आहे—ही खऱ्या अर्थाने हस्तकलेच्या वारशाची पुनर्स्थापना आहे.