भेळपुरी-पाणीपुरी’चे स्टॉल्स आरोग्यासाठी धोकादायक! — कारवाईची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

रोहा: शहरातील सुप्रसिद्ध समजल्या जाणाऱ्या ‘गणेश भेळपुरी पाणीपुरी’च्या फेरीविक्रेत्यांकडून आरोग्य नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्या शहरात अशा एकूण पाच ठेले सुरू असून, या ठिकाणी कोणतीही स्वच्छतेची सुविधा दिसून येत नाही.

विशेष म्हणजे यातील एक हातगाडी थेट नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोरच उभी असते. इतक्या जवळ असूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होते. संबंधित ठिकाणी काम करणारे कर्मचारी हातमोजे अथवा डोके झाकण्यासाठी टोपीचा वापर करत नाहीत. यापैकी एक दुकान चक्क सलूनच्या शेजारी असून, तिथून उडणारे केस थेट पाणीपुरीमध्ये पडतात

पाणीपुरीसाठी वापरण्यात येणारे पाणी हे अशुद्ध असून, त्यामध्ये स्वच्छतेचा अभाव आढळून आला आहे. ही पाणीपुरी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच खात असतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यासंदर्भात स्थानिक नागरिकांकडून मुख्याधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, या स्टॉल्सवर त्वरित कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.