मोठी बातमी: वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचे कातडे विकणार्‍या टोळीला केले जेरबंद

  • अरमोरी येथील ५ जणांना अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी, दि. १७ एप्रिल: मृत बिबट्याचे कातडे विकल्या जात असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचुन बिबटयाचे कातडे विकणारी टोळी जेरबंद केल्याची घटना १५ एप्रिल रोजी आरमोरी येथे घडली आहे.

याप्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली असुन न्यायालयाने आरोपींना १९ एप्रिलपर्यंत वनकोठडी ठोठावली आहे. यशवंत सोनबा निखारे (४५), सुभाष पंढरी धकाते (५४), विश्राम शंकर रामटेके(४७), सुदाम पांडुरंग कांबळे (४७), ईश्वर विस्तारी सोरते (३९) सर्व, रा. आरमोरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरमोरी शहरात मृत बिबट्याचे कातडे विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवले असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे वनविभागाच्यावतीने तोतया ग्राहक बनवून ५ आरोपींना अटक करण्यात आली.

त्यांच्या ताब्यातून बिबटयाचे चामडे व नखे हस्तगत करण्यात आली. तसेच दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. एका शेतात बिबटयाचे हाड मिळून आले आहे. या प्रकरणामध्ये आणखी आरोपी असल्याच्या शक्यतेने वनविभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

ही कारवाई वडसा बनविभागाचे सुदाम उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर, सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरीचे बनपरीक्षेत्र अधिकारी डोंगरवार,  वडसा वन्यजीव विभागाचे परीक्षेत्र अधिकारी आर.बी.इनवते, आरमोरीचे क्षेत्रसहाय्यक कुंभारे, वनरक्षक तिजारे, वनरक्षक शेंडे, वनरक्षक तुमपल्लीवार, वनरक्षक गिन्नलबार, वनरक्षक सहारे, वनरक्षक करकाडे, वनरक्षक सेलोटे, वनरक्षक कानकाटे व आरमोरी वनपरीक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी केली. पुढील तपास आरमोरीधे वनपरीक्षेत्र अधिकारी डोंगरवार करीत आहेत.

Forest Division