लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्यातील सीपनपल्ली (मननेराजाराम) येथील नाल्यात गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले असंतू सोमा तलांडी (वय ३५-४०, रा. जोनावाही) हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पल्ले येथील मुख्याध्यापक अखेर मृतावस्थेत सापडले. मुसळधार पावसामुळे नाल्यात आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी सीपनपल्ली नाल्यात अज्ञात मृतदेह आढळला. तलाठी व कोतवालांनी तातडीने चौकशी सुरू केली असता जोनावाही गावातील मुख्याध्यापक असंतू तलांडी हे दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. नातेवाईकांना घटनास्थळी नेऊन मृतदेह दाखवण्यात आला असता त्यांनी ओळख पटवली.
असंतू तलांडी हे १८ ऑगस्ट रोजी पेरमिलीवरून सीपनपल्ली मार्गे जोनावाहीकडे निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांनी पत्नीशी दूरध्वनीवर संपर्क साधून “घरी निघालो” असे सांगितले होते. मात्र पावसामुळे नाल्यात पाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने ते त्यात वाहून गेले. अखेर दोन दिवसांच्या शोधानंतर त्यांचा मृतदेह नाल्यात अडकलेल्या अवस्थेत सापडला. तलाठी, कोतवाल आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
या घटनेची माहिती तहसीलदार किशोर बागडे यांना देण्यात आली असून महसूल यंत्रणेकडून पुढील कारवाई सुरू आहे. पल्ले गावात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या असंतू तलांडी यांच्या अचानक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
दुर्गम भागातील मुसळधार पावसाने घेतलेला आणखी एक बळी म्हणून या घटनेची मोठ्या वेदनेने नोंद होत आहे. शिक्षक समाजासह ग्रामस्थांतून दुःखाची लाट पसरली आहे.