बिहार निवडणूक आटोपली आता राज्यात मिशन कमळ नक्की : खा.नारायन राणे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई:

बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्की होणार, असा दावा भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. याविषयी अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. लवकरच मी याबद्दल प्रसारमाध्यमांशी सविस्तर बोलेन, असे नारायण राणे यांनी सांगितले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नारायण राणे यांच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे, याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) बहुमत मिळाले होते. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बिहार निवडणुकीच्या विजयाचे संपूर्ण श्रेय मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना दिले. मी त्यांचे अभिनंदन करतो. देशातील जनतेच्या सुरक्षिततेची काळजी घेतल्याने आणि त्यांच्या इतर समस्या सोडवल्यामुळे भाजपला बिहारमध्ये विजय मिळाला, असा दावा नारायण राणे यांनी केला.

यावेळी नारायण राणे यांनी राज्य सरकारच्या फटाकेमुक्त दिवाळी या धोरणाचा विरोध केला. दिवाळी हा आमचा आनंद साजरा करण्याचा सण आहे. हा लहान आणि मोठ्यांचा दोघांचाही सण आहे. त्यामुळे राज्य सरकारने फटाके वाजवण्यावर बंदी घालून हा आनंद हिरावून घेऊ नये. माझा फटाकेमुक्त दिवाळीला विरोध आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले.