लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली : मुलेचरा तालुक्यातील सुंदरनगर परिसरात आज दुपारी पावणे चारच्या सुमारास किरकोळ वादातून एका दुचाकीधारकाने राज्य परिवहन (एसटी) वाहकावर दुचाकीची चावी फेकून डोक्यात गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे अहेरी आगारातील एसटी सेवा तब्बल एक तास बंद ठेवण्यात आली होती.
अहेरी आगाराची गडचिरोली–मुलचेरा–अहेरी मार्गावरील बस (क्र. MH १४ LX ५१७७) सुंदरनगरजवळ येताच रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात चाक अडकल्याने चालक सेवाधारी तराळे यांनी बस थांबवली. त्याचवेळी कोपरअली येथील व्यंकटेश गाजर्लावार हा दुचाकीवरून समोरून येत होता. बस रस्त्यात का उभी केली यावरून त्याने संताप व्यक्त करत शिवीगाळ केली. वाहक सुहास हंबर्डे यांनी “रस्त्यात जागा आहे, तुम्ही जाऊ शकता,” एवढे सांगताच गाजर्लावारने संतापाच्या भरात दुचाकीची चावी काढून हंबर्डे यांच्या डोक्यावर प्रहार केला. या अचानक हल्ल्यात हंबर्डे गंभीर जखमी होऊन रक्तस्त्राव सुरू झाला.
जखमी वाहकाने तत्काळ अहेरी एसटी आगार व मुलचेरा पोलिसांना माहिती दिली. काही मिनिटांत मुलचेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हंबर्डे यांना स्थानिक दवाखान्यात दाखल केले आणि आरोपी गाजर्लावार याला तातडीने अटक केली. या प्रकरणी मुलचेरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
घटनेची बातमी अहेरी येथील राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी सर्व एसटी बस तातडीने बंद ठेवत आंदोलनाचा इशारा दिला. “आरोपी अटकेत घेतल्याशिवाय फेऱ्या सुरू करणार नाही,” असा ठाम पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. पोलिसांनी काही वेळातच आरोपीला ताब्यात घेतल्यावर एसटीची सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.
सुंदरनगर परिसरातील अरुंद व खड्डेमय रस्त्यांमुळे एसटी बस अनेकदा रस्त्यात अडकतात, त्यामुळे प्रवासी, चालक व वाहक यांना वारंवार त्रास सहन करावा लागतो. स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी पुन्हा एकदा जोरात केली आहे.