जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या कामांचे बील मिळता मिळेना !

  • जिल्ह्यातील लहान कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ.
  • जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याची कंत्राटदारांची मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली दि ०९ फेब्रुवारी : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान योजना अंतर्गत कोट्यवधी रुपयांचे कामे करण्यात आले होते. या योजनेच्या जिल्हास्तरीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आणि सदस्य-सचिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली हे होते. सदरच्या योजनेमार्फत जिल्ह्यातील विविध विभागांतर्गत सन २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात जलयुक्त शिवार अभियान योजनेतुन कोट्यवधी रुपयांचे कामे करण्यात आले होते. मात्र सन २०२० मध्ये कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे दि. २५ मार्च २०२० रोजी पासून देशात लॉकडाऊन लावण्यात आले त्यानंतर दि. २८ मार्च २०२० पासून शासनाच्या अनुदान वितरण प्रणाली (बी.इ.ए.एम.एस.) मधून बी.डी.एस निघत नसल्याने सदरच्या योजनेतील कित्येक कामे पूर्ण होऊन त्या कामांची निधी शासनास समर्पित करण्यात आली होती.


जिल्ह्यातील कित्येक विभागात जलयुक्त शिवार अभियान योजना अंतर्गत कामे झाले आहेत आणि त्या  काम पूर्ण झाल्याने कंत्राटदार सदरच्या कामाची रक्कम संबंधित विभागाकडे मागणी केल्यानंतर त्या कामाची निधी समर्पित झाल्याचे त्या विभागांनी कंत्राटदारांना सांगितले. दरम्यान जिल्ह्यात राबविण्यात आलेली जलयुक्त शिवार अभियान योजना शासकीय असल्याने ही योजना जरी बंद झाली असेल पण योजनेतील काम पूर्ण झाल्याने त्या कामांची रक्कम इतर योजनेतून देण्यात यावी किंवा जिल्हा नियोजन समिती मधून रक्कम देण्यात यावी अशी मागणी जिल्हातील कंत्राटदार करीत आहे.