लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि,२२ : तब्बल आठ वर्षांनंतर पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीने गडचिरोलीच्या स्थानिक राजकारणात निर्णायक वळण घेतले असून, या निकालाने भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यातील तिन्ही नगर परिषदांवर पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व अधोरेखित केले आहे. हा विजय केवळ सत्ताबदलापुरता मर्यादित नसून, पक्षाने नगराध्यक्षपदासाठी उतरवलेल्या तिन्ही नवख्या उमेदवारांवर मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे त्याचे राजकीय महत्त्व अधिक ठळक झाले आहे.
गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या अश्विनी रविंद्र नैताम यांचा तब्बल ४,८३९ मतांनी पराभव करत नगर परिषदेच्या राजकारणात ठसठशीत प्रवेश केला. या विजयासह त्या सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या उमेदवार ठरल्या असून, नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणूनही त्यांची नोंद झाली आहे. काँग्रेसच्या कविता सुरेश पोरेड्डीवार यांना या तिरंगी लढतीत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
२७ सदस्यीय नगर परिषदेच्या सभागृहात भाजपने १५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. काँग्रेसला ६, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला ५, तर वंचित बहुजन आघाडीला १ जागा मिळाली. हा निकाल आकड्यांचा खेळ नसून, गडचिरोलीतील मतदारांनी दिलेला स्पष्ट राजकीय कौल असल्याचे मानले जात आहे.
“गडचिरोलीकरांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. नगराध्यक्षपदाचा उपयोग अधिकारासाठी नव्हे, तर विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि शहराच्या भविष्यकालीन नियोजनासाठी प्रामाणिकपणे केला जाईल,” अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी निकालानंतर दिली.
या विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने एकत्र येत आपली उपस्थिती ठसठशीतपणे नोंदवली. पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) तथा माजी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष व निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे आदींनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अभिनंदन करत विजयी जल्लोष साजरा केला.
या निवडणुकीत मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळेच त्यांनी तिन्ही नगर परिषदांतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी गडचिरोलीत स्वतः जाहीर सभा घेतली. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संघटनात्मक यंत्रणेने घेतलेली मेहनत या निकालातून स्पष्टपणे दिसून आली असून, त्या एकत्रित प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.
विशेष म्हणजे, तिन्ही नगर परिषदांमध्ये भाजपने केवळ सत्ता मिळवली नाही, तर स्पष्ट बहुमताचाही टप्पा ओलांडला आहे. निवडणुकीदरम्यान ‘मैत्रीपूर्ण लढतीनंतरही महायुती कायम राहील,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले होते. त्यामुळे आता भाजप मित्रपक्षांना सत्तेत वाटेकरी करणार की स्वबळावर सत्ता स्थापन करत आपली राजकीय ताकद अधिक ठामपणे मांडणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता कायम आहे.
गडचिरोलीतील हा निकाल केवळ नगर परिषदेपुरता मर्यादित न राहता, आगामी स्थानिक व जिल्हास्तरीय राजकीय समीकरणांची दिशा ठरवणारा ठरेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.