लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सुट्टीचा दिवस, उकाड्याने हैराण झालेल्या तरुणांनी थोडीशी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. व्हॉलीबॉल खेळणे सोडून अंघोळीसाठी गेले आणि मृत्यूच्या खोल प्रवाहात कधी सामावले गेले, हे त्यांच्या मित्रांनाही कळले नाही. गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी शनिवारी (१० मे) दुपारी वैणगंगा नदीत बुडाले. रविवारी सकाळी त्यांच्या मृतदेहांचे शोधकार्य यशस्वी झाले. या घटनेने संपूर्ण वैद्यकीय महाविद्यालयात शोककळा पसरली आहे.
शिवाय, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून याबाबतची माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे यांनी दिली.
बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे:
1. गोपाल गणेश साखरे (वय २०) – रा. चिखली, जि. बुलढाणा
2. पार्थ बाळासाहेब जाधव (वय २०) – रा. शिरडी, जि. अहमदनगर
3. स्प्रिल उद्धवसिंग शिरो (वय २०) – रा. संभाजीनगर
हे तिघेही गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षाचे विद्यार्थी होते. शनिवारी दुपारी हे मित्र नदीत अंघोळीसाठी गेले होते. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाले. घटनेची माहिती मिळताच बचावपथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र अंधारामुळे ती थांबवावी लागली.
रविवारी सकाळी मृतदेह सापडले
रविवारी सकाळी पुनश्च सुरू झालेल्या शोधमोहीमेत पाण्यात बुडालेल्या तिघांचे मृतदेह सापडले. त्यानंतर त्यांना शवविच्छेदनासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. घटनास्थळी व महाविद्यालयात शोककळा पसरली असून सहाध्यायी विद्यार्थी व शिक्षक यांना मोठा धक्का बसला आहे.
शोकमग्न महाविद्यालय आणि कुटुंबीय
गडचिरोलीसारख्या आदिवासी भागात डॉक्टर होण्यासाठी शिक्षण घेणारे हे विद्यार्थी अचानक काळाच्या उदरात गडप झाल्याने त्यांचे कुटुंबीय कोसळले आहेत. स्वप्नांचे माहेरघर गाठण्याआधीच हे तुटलेले स्वप्न संपूर्ण परिसराला हळहळ लावणारे ठरले.