भारतीय संविधानाचे ब्रेल लिपीत रुपांतर

सामाजिक न्याय, विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याहस्ते प्रकाशन संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 16 : भारतीय संविधानाचे ब्रेल लिपीत रुपांतर करुन ते अंध बांधवांना उपलब्ध करुन देण्याचे मोलाचे काम झाले आहे. सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून दिव्यांगांसाठी अशा नाविण्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ करताना विशेष आनंद वाटतो, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे आज येथे केले.

ठाणे येथील अस्तित्व फाऊंडेशन या दिव्यांग निराधार यांचे कल्याणार्थ काम करणाऱ्या अशासकीय संस्थेमार्फत दिव्यांगांसाठी ब्रेल संविधान तयार केले असून त्याच्या मंत्रालय येथे आयोजित प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू, भिवंडीचे आमदार रईस शेख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

वर्षभरात दिव्यांगांसाठी 32 निर्णय – राज्यमंत्री बच्चू कडू
अंध बांधव ब्रेल लिपीतील संविधान आता स्पर्शाने वाचू शकतील ही मोठी ताकद आहे, त्याबद्दल हे ब्रेल लिपीतील संविधान तयार केलेल्यांचे आभार व अभिनंदन. या शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अस्तित्व फाऊंडेशनचे ब्रेल लिपीतील संविधान निर्मितीबद्दल कौतुक केले. तसेच बोलताना पुढे म्हणाले, गेल्या कित्येक वर्षापासून मी दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी लढत आहे. तो लढा असूनही सुरु आहे. गेल्या वर्षभरात आम्ही दिव्यांगांसाठी 32 शासन निर्णय निर्गिमीत केले. त्याचा मोठा लाभ होईल.
अनेक क्षेत्रात असे लक्षात आले आहे की, आपल्या पेक्षा अधिक काम हे दिव्यांग बांधव करतात. क्रिडा सारख्या क्षेत्रातही ते पुढे आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र बजेट पाहिजे तो त्यांचा हक्क आहे. देवाला, परमेश्वराला शोधण्यासाठी देवालयात जाण्यापेक्षा एखाद्या दिव्यांगांला पोटभर जेवू घातले तर निश्चितच देव पावेल.
या कार्यक्रमाच्या आयोजनाच्याबाबत त्यांनी आयोजकाचे विशेष आभार मानले.
आमदार रईस शेख यांनीही चांगला उपक्रम आयोजित केल्याबद्दल आभार मानून दिव्यांगांसाठी स्पेशल बजेट व राखीव जागा असाव्यात याचा ऊहापोह केला. प्रकाशनानंतर एका अंध मुलाकडून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कमलाकर पवार यांनी केले.

चौकट अस्तित्व फाऊंडेशन ठाणे यांच्यामार्फत श्रीमती प्रियंका झाल्टे व राहूल झाल्टे यांनी हे ब्रेल लिपीत संविधान तयार करुन घेतले. एकूण 156 पाने असलेले हे ब्रेल संविधान खरे तर 8 दिवसात तयार होऊ शकले असते. पण अंध मुलांना रोजगार देण्याची प्रामाणिक उद्देश भावना व इच्छा असल्याने हे निर्मिती कार्य माहे फेब्रु. ते जुलै असे तब्बल 7 महिने चालले. नॅब या संस्थेतून ब्रेल शिकलेल्या 15 अंध विद्यार्थ्यांचा रोजगार बुडाला होता. त्यामुळे भूकेचा प्रश्न होता. या 15 मुलांना 7 महिने रोजीरोटी मिळून हे ब्रेल संविधान माहे जुलै 2020 रोजी प्रत्यक्ष साकार झाले.